गुंगीचे औषध देऊन केले बंदिस्त : कमलापूर हत्ती कॅम्पमधील दहशत संपुष्टात कमलापूर : सिरोंचा वन विभागाअंतर्गत येत असलेल्या कमलापूर हत्ती कॅम्पमधिल अजित नावाच्या हत्तीने ११ जुलैपासून धुमाकूळ घालण्यास सुरू सुरूवात केली होती. अजितच्या या वागण्यामुळे वन विभागाचे कर्मचारी व परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. पिसाळलेल्या अजितमुळे कमलापूर हत्ती कॅम्पमध्ये दहशत निर्माण झाली होती. दरम्यान ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे पशुधन वैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) डॉ. रवीकांत खोब्रागडे यांच्या नेतृत्वात डॉक्टरांच्या चमूने त्याला गुंगीचे औषध देऊन बंदिस्त केले. त्यामुळे आता अजित नावाच्या हत्तीची दहशत संपुष्टात आली आहे. कमलापूर हत्ती कॅम्पमध्ये एकूण सात हत्ती आहेत. अजित नावाच्या हत्तीचा जन्म ७ जुलै १९९४ साली झाला. सदर हत्तीने सन २०१० पासून अधुमधून धुमाकूळ घालणे सुरू केले. वर्षातून किमान दोन ते तिनदा तरी अजित आपली दादागिरी दाखवित होता. आतापर्यंत त्याने अनेक वाहनांची तोडफोड केली. कमलापूर-दामरंचा मार्गावर अजित दादागिरी करीत असायचा. त्यामुळे या मार्गावर त्याची दहशत निर्माण झाली होती. २६ मार्च २०१३ रोजी अजितने पेंटा आत्राम नामक महावताला ठार केले. लहान-मोठ्या हल्ल्याच्या अनेक घटना अजितकडून घडल्या. हत्तींवर उपचार करण्यासाठी येथे स्वतंत्र वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नाही. पिसाळलेल्या अजित नामक हत्तीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची चमू नुकतीच कमलापूर हत्ती कॅम्पमध्ये दाखल झाली. या चमूने सर्वप्रथम २२ वर्षीय अजित नामक पिसाळलेल्या हत्तीला गुंगीचे औषध दिले. त्यानंतर या हत्तीला बेड्या ठोकून त्याला बंदिस्त करण्यात आले. पिसाळलेल्या हत्तीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) डॉ. रवीकांत खोब्रागडे यांच्या नेतृत्वात डॉ. संदीप छांडेकर, पशुधन विकास अधिकारी डॉ. नीलेश खल्लारे, डॉ. सचिन यांच्यासह चमूतील इतर अधिकारी व वन विभागाचे अधिकाऱ्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर) दादागिरी वाढल्याने महालिंगाला केले ठार अजितचा वडील महालिंगा हा सुध्दा प्रचंड प्रमाणात धुमाकूळ घालत होता. त्याच्या धुमाकूळामुळे वन विभागाचे कर्मचारी व परिसरातील जनता दहशतीत होती. त्याला वठणीवर आणण्याचा अनेक वेळा प्रयत्न झाला. मात्र महालिंगाचे धुमाकूळ घालणे बंद झाले नाही. त्यामुळे शेवटचा उपाय म्हणून महालिंगाला गोळ्या घालून ठार करण्यात आले होते. मात्र पिसाळलेल्या अजितवर नियंत्रण मिळविण्यात डॉ. रवीकांत खोब्रागडे यांच्या नेतृत्वात यश आल्याने दहशतीचा प्रश्न मार्गी लागला आहे.
पिसाळलेल्या ‘अजित’वर नियंत्रण
By admin | Updated: July 28, 2016 02:09 IST