ठाणेगाव : आरमोरी तालुक्यातील डोंगरगाव (भु.) येथील अंगणवाडीनजिक असलेल्या हातपंपाला ओटा बनविण्यात आला नाही. त्यामुळे हातपंपाच्या सभोवताल मोठा खड्डा निर्माण झाला असून त्यात त गढूळ पाणी साचत असते. सदर गढूळ पाणी हातपंपातून बाहेर पडते. परिणामी या गावातील नागरिकांना गेल्या अनेक दिवसापासून गढूळ पाणी प्यावे लागत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.डोंगरगाव (भु.) या गावात तीन हातपंप व एकच विहिर आहे. यावरच नागरिकांना आपले तहान भागवावी लागते. अंगणवाडीनजिक हातपंपाचा ओटा पुर्णत: फुटला. ग्रा.पं. प्रशासनाने २0 दिवसांपूर्वी नवीन ओटा तयार करण्यासाठी जुन्या ओट्याची तोडफोड केली. यामुळे मोठा खड्डा निर्माण झाला. नवीन ओटा बनविण्याकडे ग्रा.पं. प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप गावातील नागरिकांनी केला आहे. (वार्ताहर)
डोंगरगावात दूषित पाण्याचा पुरवठा
By admin | Updated: June 5, 2014 23:59 IST