गडचिरोली : शहरात विविध भागांत घराचे बांधकाम सुरू असून बांधकाम साहित्य रस्त्यावर ठेवत आहेत. लोखंडी सळ्या तोडण्याचे कामही रस्त्यावरच करण्यात येते. शिवाय रस्त्यावरच विटा, रेती, गिट्टी, सळ्या आदी साहित्यही ठेवले आहे. मात्र याकडे न.प.चे दुर्लक्ष आहे. साहित्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन अपघातही वाढले आहेत.
मोकाट जनावरांमुळे रहदारी बाधित
आष्टी : शहरातील मुख्य मार्गांवर मोकाट जनावरे मधोमध उभी राहतात. त्यामुळे रहदारी बाधित होत असून वाहनधारकांना नेहमी अपघाताची भीती असते. अनेक मार्गांवर मोकाट जनावरांमुळे वाहतूक बाधित होते. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे. रात्रीच्या सुमारास या मोकाट जनावरांमुळे अपघात वाढले आहेत.
ग्रामीण भागातील स्मशानभूमींची दुरवस्था
कुरखेडा : जि.प. प्रशासनामार्फत दहन व दफनभूमी बांधण्याची योजना गेल्या काही वर्षांपासून हाती घेण्यात आली असली तरी ग्रामीण भागातील अनेक गावांतील जुन्या स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणचे दहनशेड मोडकळीस आले असून स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्तादेखील नाही. बहुतांश स्मशानभूमीकडे जाणारे रस्ते पांदण रस्ते आहेत. या रस्त्यांवर अतिक्रमण झाले आहे.
डुकरांच्या बंदोबस्ताकडे पालिकेचे दुर्लक्ष
गडचिरोली : गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली शहरातील सर्व २३ वार्डांत डुकरांचा हैदोस प्रचंड वाढला आहे. मात्र पालिकेच्या वतीने डुकरांच्या बंदोबस्ताकरिता काही महिन्यांपूर्वी हाती घेण्यात आलेली मोहीम थंडबस्त्यात असल्याचे दिसून येते. पालिका प्रशासनाचे डुकराच्या हैदोसाकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे.
बसस्थानकातील पोलीस चौकी सुरू करा
गडचिरोली : महामंडळाचे गडचिरोली आगार व पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली बसस्थानक परिसरात पोलीस चौकी उभारण्यात आली होती. मात्र या पोलीस चौकीत एकही पोलीस कर्मचारी उपस्थित राहत नाही. अनेकदा सदर पोलीस चौकी कुलूपबंद दिसून येते. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बसस्थानकातील पोलीस चौकी नियमित सुरू ठेवावी, अशी मागणी होत आहे.
मादक पदार्थांच्या सेवनामुळे आजारात वाढ
एटापल्ली : आहाराच्या बदलत्या सवयी, मादक पदार्थाचे सेवन, मद्यपान, धूम्रपान यामुळे अनेक गंभीर परिणाम समोर येत आहेत. अनेक जणांना आजाराची लागण होत आहे. त्यामुळे रुग्णालयात गर्दी वाढत आहे. प्रशासनाच्या वतीने अनेक ठिकाणी कारवाई होत नाही. त्यामुळे तंबाखूजन्य पदार्थ विक्रीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
रेपनपल्ली-कमलापूर रस्त्याची दुरवस्था
कमलापूर : कमलापूर ते रेपनपल्ली या तीन किमीच्या रस्त्यावरील डांबर जागोजागी उखडले आहे. आतील दगड व गिट्टी बाहेर आली आहे. तसेच या रस्त्यावर असलेले पूलसुद्धा जीर्ण अवस्थेत आहे. अनेक पुलांना कठडेही लावण्यात आलेले नाहीत.
कारवाफा नाल्यावरील पुलाची उंची वाढवा
धानोरा : तालुक्यातील कारवाफा नाल्यावरील पुलाची उंची वाढविण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पावसाळ्याच्या दिवसांत अनेकदा सदर मार्ग बंद राहत असल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे.
चपराळा पर्यटनस्थळाचा विकास करा
आष्टी : चामोर्शी तालुक्यातील श्रीक्षेत्र प्रशांतधाम चपराळा येथे दरवर्षी महाशिवरात्रीला यात्रा भरते. मात्र या ठिकाणी सोयी-सुविधांचा अभाव असल्याने भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या स्थळाचा विकास करावा.
धानोरा येथे औद्योगिक वसाहतीचे काम थंडबस्त्यात
धानोरा : छत्तीसगड सीमेला लागून असलेल्या धानोरा तालुका मुख्यालयात औद्योगिक वसाहत निर्माण करण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला होता. मात्र याबाबत अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे औद्योगिक वसाहतीचे काम थंडबस्त्यात आहे.
वीज उपकेंद्र निर्मितीचे काम खोळंबले
सिरोंचा : अतिदुर्गम व ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होतो. परिणामी शेतकरी, विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो. परिणामी नवीन ३३ के.व्ही. उपकेंद्र निर्मितीची मागणी नागरिकांकडून होत आहे. मात्र अजूनपर्यंत या उपकेंद्राचे काम करण्यात आले नाही.
पशुवैद्यकीय विभागातील रिक्त पदे त्वरित भरा
एटापल्ली : पशुवैद्यकीय विभागात अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे जनावरांवर वेळीच उपचार होण्यास अडथळे येतात. अनेक पशुवैद्यकीय दवाखान्यांत कर्मचारी उपलब्ध नसल्याने शिपाईच कारभार सांभाळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.