अहेरी : तालुका मुख्यालयापासून ४० किमी अंतरावरील अतिसंवेदनशील व दुर्गम भागातील मलमपल्ली या गावात सिंचनाची सुविधा नसल्याने दरवर्षी दुष्काळाचा सामना करावा लागतो. त्यामुळे शेती व इतर उपयोगाकरिता तलावाची अत्यंत गरज लक्षात घेऊन तलावाच्या बांधकामास मंजुरी देण्यात यावी, या मागणीसाठी मलमपल्ली येथील शेतकरी मंगळवारी अहेरीच्या तहसील कार्यालयावर धडकले. जि. प. चे कृषी सभापती अजय कंकडालवार व मलमपल्लीच्या सरपंच सीताबाई वेलादी यांच्या नेतृत्वात तहसीलदार प्रशांत घोरुडे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, गावात तलाव बांधकाम करण्यासाठी ग्रामस्थांनी अनेकदा विनंती केली. तलावाकरिता लागनारी जमीनसुध्दा गावकऱ्यांनी प्रशासनाला देण्याची तयारी दर्शविली व सर्व गावकरी श्रमदानातून तलाव बांधकाम करण्याची तयारी दाखविली. पण आजपर्यंत तलाव बांधकामाला मंजुरी मिळाली नाही. या गावात तलाव बांधल्यास शेतकऱ्यांची अंदाजे दोनशे एकर जमीन ओलीताखाली येवू शकते. शेती पूर्णपणे वरच्या पावसावर अवलंबून असल्याने येथील शेतकऱ्यांना नेहमीच दुष्काळाचा सामना करावा लागतो. तहसीलदार प्रशांत घोरुडे यांनी निवेदन स्वीकारुन वरिष्ठ कार्यालयाला तलाव बांधकाम मंजुरी करीता प्रस्ताव सादर करण्यात येईल, असे आश्वासन दिले. निवेदन देताना कार्तिक तोगम, आनंदराव कोंडागुर्ले, राजम सोदारी, लिंगा डोंगरे, शंकर दुर्गे, लचय्या गेडाम, बंडू गेडाम, कमला बेडकी, जयश्री दुर्गे, सुशिला डोंगरे यांचेसह बहुसंख्य शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
तलाव बांधून द्या : मलमपल्लीवासीयांची तहसीलवर धडक
By admin | Updated: January 26, 2017 01:53 IST