गडचिरोली/अहेरी : ‘अच्छे दिन आएंगे’ असे स्वप्न दाखवून भाजपने सत्ता हस्तगत केली. मात्र मोदी सरकारने महागाई कमी करण्याऐवजी भाववाढ करून सर्वसामान्यांचे जीवन कठीण केले आहे. महागाईच्या मुद्यावर आक्रमक होत काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गडचिरोली व अहेरी येथे रविवारी धक्का मारो मोटार सायकल रॅली काढून केंद्र सरकारचा निषेध केला. गडचिरोली येथे जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने रविवारी दुपारी १२ वाजता येथील इंदिरा गांधी चौकातून आठवडी बाजार चौकापर्यंत मोटारसायकल धक्का मारो रॅली काढून मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. यापूर्वी इंदिरा गांधी चौकात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणातून मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढविला. नव्याने केंद्रात स्थापन झालेल्या मोदी सरकारकडून सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड अपेक्षा होत्या. मात्र मोदी सरकारने सर्वसामान्यांच्या अपेक्षांकडे पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. काँग्रेसच्या राजवटीत देशात पेट्रोल डिझेल गॅस व इतर जीवनावश्यक वस्तूंचे भाव मर्यादित होते. मात्र मोदी सरकारला एक महिना होताच या सर्व वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. वाढत्या महागाईमुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य जनता होरपळली जात आहे, अशी टिका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हसनअली गिलानी, प्रभाकर वासेकर, सुनिल वडेट्टीवार, पांडुरंग घोटेकर, समसेरखॉ पठाण, नगरसेवक नंदू वाईलकर, सुनील खोब्रागडे, राकेश रत्नावार, घनश्याम वाढई, जलेंद्र खोब्रागडे, बापू वरगंटीवार, काशिनाथ भडके, देवाजी सोनटक्के, योगेश सोनुले, श्रीकांत काथवटे, उमेश पेटकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. गडचिरोलीच्या आंदोलनात आमदार डॉ. नामदेव उसेंडी उपस्थित होते.मोदी सरकारने केलेल्या भाववाढीच्या विरोधात रविवारी अहेरीत तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने मज्जीद चौक ते राजे विश्वेश्वरराव महाराज चौकापर्यंत मोटारसायकल धक्का मारो रॅली काढून निषेध करण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व तालुकाध्यक्ष मेहबूब अली यांनी केले. यावेळी अरूण बेझलवार, प्रशांत आर्इंचवार, हाजी जलीलोद्दीन फाशी, सुरेश मडावी, अशोक आलाम, बब्बू शेख, विजय बोरकुटे, अर्जुन कांबळे, बंडू वेलादी, चेतन कोरेत, संदीप ढोलगे, साबीर शेख, विनायक वेलादी, फलीम शेख आदी उपस्थित होते.
महागाईविरोधात काँग्रेसची निषेध रॅली
By admin | Updated: July 6, 2014 23:55 IST