लक्ष घाला : मारोतराव कोवासेंनी डागली तोफगडचिरोली : राज्यातील आघाडी सरकारने अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले असले तरी सरकारच्या या निर्णयाची ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत माहिती पोहोचविण्यासाठी जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष संघटन पूर्णत: अपयशी ठरले आहे. आदिवासी भागातील लोकापर्यंत योजनांचा लाभ पोहोचलेलाच नाही, अशी टिका माजी खासदार मारोतराव कोवासे यांनी केली आहे. मारोतराव कोवासे यांनी म्हटले आहे की, गेल्या १० वर्षात राज्यातील काँग्रेस आघाडीच्या सरकारने अनेक चांगले निर्णय घेतलेत परंतु सरकार चालविणाऱ्या नेतृत्वाला हे निर्णय लोकापर्यंत पोहोचविता आले नाही. काँग्रेस पक्ष संघटनेचे काम सरकारचे निर्णय लोकापर्यंत नेण्याचे आहे. परंतु जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे संघटन निष्क्रीय लोकांच्या हातात देण्यात आले असल्याने त्यांना सरकारच्या निर्णयाची माहिती गावापर्यंत नेताच आली नाही. आजही अनेक आदिवासी बहूल गावात खावटी कर्ज आदिवासींना मिळालेले नाही. सरकारच्या अनेक योजनांचा लाभ आदिवासीपर्यंत पोहोचलेला नाही. विधानसभा निवडणुकीला आणखी दोन महिन्याचा कालावधी आहे. या कालावधीचा उपयोग गतीमान प्रशासन करून लोकापर्यंत योजना पोहोचविण्यासाठी करण्यात यावा. तसेच सरकारच्या निर्णयाची जनजागृती काँग्रेस पक्षाने गावागावात जाऊन करावी, असा सल्लाही मारोतराव कोवासे यांनी दिला आहे. परिस्थिती जर बदलविली नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीतही लोक पक्षाला धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही, अशी भितीही कोवासे यांनी व्यक्त केली आहे. काँग्रेस पक्ष संघटनेने याबाबत गांभिर्याने लक्ष देण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. (जिल्हा प्रतिनिधी)
योजना पोहोचविण्यात काँग्रेस संघटन अपयशी
By admin | Updated: June 29, 2014 23:54 IST