स्थानिकांशी संवाद साधा : १०० एकरावरील आदिवासींची उपजीविका नष्ट होण्याची भीतीगडचिरोली : मुलचेरा तालुक्यातील चेन्ना या प्रकल्पात १२ गावांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे. वगळलेल्या गावांना समाविष्ट करून पाण्याची सोय होत असल्यास या परिसरातील तिन्ही ग्रामपंचायती प्रकल्पाला मान्यता देऊ शकतील, अशी परिस्थिती असल्याचे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे.१९७७ मध्ये मुखडी गावालगत किमान ३५० ते ४०० हेक्टर जंगल परिसराचे सर्वेक्षण करण्यात आले होते. तेव्हापासून वनजमिनीचा प्रस्ताव प्रलंबित राहिला. २०१६ मध्ये या प्रकल्पाला पुन्हा मंजुरी मिळाली व सर्वेक्षणाची रूपरेषा तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले. मुलचेरा तालुक्यात १८ गावांना या प्रकल्पाद्वारे पाण्याची सोय होणार आहे. प्रकल्पाच्या कालव्याच्या बाजुला असलेल्या तीन ग्रामपंचायतमधून दोन ग्रामपंचायती या पेसा प्र क्षेत्रात मोडणाऱ्या आहे. एकूण १२ गावांना प्रकल्पातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे त्या गावातील शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ होणार नाही. त्यामुळे या प्रकल्पाला अनुमती मिळण्यास ग्रामस्थांचा विरोध असल्याची भूमिका दिसून येत आहे. प्रकल्पाच्या उभारणीला विरोध नाही. मात्र प्रकल्पात वगळण्यात आलेले गाव समाविष्ट करावे, त्यांच्या पर्यंतही पाणी पोहोचले पाहिजे, याचे नियोजन करावे, अशी मागणी जोर धरून आहे. प्रकल्प ज्या ठिकाणी होणार आहे, तेथे किमान १०० एकर जमिनीवर आदिवासींची उपजीविका अवलंबून आहे. शेतीशिवाय दुसरे कोणतेही उपजिविकेचे साधन या भागात नाही. त्यामुळे आदिवासी समाजाला या प्रकल्पामुळे बाधा निर्माण होईल, अशी भिती वाटत आहे. त्यामुळे विद्यमान सरकार, लोकप्रतिनिधी व प्रशासन यांना जनतेशी सुसंवाद साधून मार्ग काढावा लागणार आहे. त्याशिवाय या प्रकल्पाला स्थानिक ग्रामसभांची मंजुरी मिळणे कठीण आहे. यासाठी आता नव्याने प्रयत्न करून सर्वच स्तरावर नागरिकांशी व ग्रामसभांशी चर्चा होणे आवश्यक ठरणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
१२ गावांना वगळल्याने चेन्ना प्रकल्पाला सहमतीस अडचण
By admin | Updated: September 21, 2016 02:23 IST