नगर पंचायत कार्यालयाच्या बाजूलाच सांस्कृतिक भवन आहे. याच भवनात शासकीय, निमशासकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रम व सभा घेतल्या जातात. सांस्कृतिक भवनाला पूर्व, पश्चिम, व दक्षिण असे तीन दरवाजे आहेत. तिन्ही दरवाज्याच्या झडपा तूटफूट झाल्या आहेत. काहीचे पत्रे गायब झाले आहेत. तसेच भवनाच्या सभोवती खिडक्या आहेत. त्या खिडक्यांची काच अनेक वर्षापासून फुटलेली असून आता फक्त झडपा मोकळ्या पडल्या आहेत. भवनात इलेक्ट्रिक फिटिंग केलेली आहे. पंख्याची व्यवस्था आहे. परंतु ते पंखे शाेभेची वस्तू ठरत आहेत. इलेक्ट्रिक फिटिंग, बटन, फॅन बोर्ड यांची मोडतोड झाली आहे. काही ठिकाणी वायरिंग मोकळी आहे. आतमध्ये कार्यक्रमाचे स्टेज असून बाजूला दोन खोल्या आहेत. त्यांची दुरवस्था झाली आहे. भवनाची आतमधील फरशी फुटलेली आहे. येथील विद्युत पुरवठा आता बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे नगर पचायंत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांत बोलले जात आहे.
नगरपंचायत प्रशासनाने या समस्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
सांस्कृतिक भवन समस्यांच्या विळख्यात असले तरी या ठिकाणी कार्यक्रम होत असतात. कारण चामोर्शी शहरात इतरत्र दुसरे भवन नसल्याने त्याच ठिकाणी कार्यक्रम घेतल्याशिवाय पर्याय नसतो. याठिकाणी कार्यक्रमासाठी नगर पंचायत प्रशासनातर्फे पाचशे रुपयांची सामान्य पावती फाडावे लागते. त्यानंतर या ठिकाणी कार्यक्रम करण्याची परवानगी दिली जाते. आता कोरोना असल्याने व संचारबंदी असल्याने आता सांस्कृतिक भवन येते कोणतेही कार्यक्रम करण्यास परवानगी दिली जात नाही. एकमेव असलेल्या सांस्कृतिक भवनाची दुरुस्ती करून विद्युत व्यवस्था, रंगरंगोटी, दाराची व खिडक्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी शहरवासीयाकडून जोर धरत आहे. १९ एप्रिलपासून चामोर्शी येथील फिल्टर प्लॅन जवळील विद्युत डीपी ट्रान्सफार्मर जळल्याने येथील पाणीपुरवठा बंद आहे. तो दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा अशी मागणी आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.