गडचिरोली : प्रादेशिक वनवृत्त गडचिरोली कार्यालयाअंतर्गत गडचिरोली, सिरोंचा, आलापल्ली, भामरागड व वडसा वन विभागाअंतर्गत जवळपास दीडशे अनुकंपाधारक शासकीय नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. वारंवार निवेदन देऊन तसेच पाठपुरावा करूनही वन विभागाने सेवेत सामावून घेतले नाही. वन विभागाने तत्काळ नोकरी द्यावी, वनरक्षक पदासाठी अनुकंपाधारकांना १२ वी विज्ञानची अट शिथील करावी, या मागणीसाठी १२ अनुकंपाधारकांनी सोमवारपासून गडचिरोलीच्या मुख्य वनसंरक्षक, प्रादेशिक वनवृत्त कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.उपोषणकर्त्यांमध्ये उमाजी चुधरी, श्याम पस्पुनुरवार, बाबुराव रामगिरवार, प्रकाश चौधरी, सूदर्शन दुर्गे, गणेश मरस्कोल्हे, प्रकाश सिडाम, नितेश कारेत, अनिल डोके, प्रशांत चौधरी, सुब्बाराव येरमा शेट्टी, दर्शना उराडे आदींचा समावेश आहे. अन्यायग्रस्त अनुकंपाधारकांनी यापूर्वी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह वन विभागाचे प्रधान सचिव, मुख्य वनसंरक्षक व वनसंरक्षक यांना निवेदन देऊन वन विभागाच्या सेवेत सामावून घेण्याची मागणी केली होती. मात्र वन विभागाने यासंदर्भात कोणतीही कार्यवाही केली नाही. अनुकंपाधारकांना नोकरीत सामावून न घेतल्यास २५ जानेवारी सोमवारपासून गडचिरोलीच्या प्रादेशिक वनवृत्त कार्यलयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा १२ अनुकंपाधारकांनी दिला होता, असेही उपोषणकर्त्यांधारकांनी उपोषणमंडपात सांगितले.
अनुकंपाधारकांचे उपोषण सुरू
By admin | Updated: January 26, 2016 02:09 IST