गडचिरोली : अन्न औषध विभागाचे आयुक्त महेश झगडे हे गडचिरोलीत चर्चासत्रासाठी येणार याची माहिती कुठल्याही प्रसारमाध्यमाला देण्यात आली नव्हती. मात्र अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी गडचिरोली शहरातील तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणारे ठोक विक्रेते व पानटपरी चालकांच्या संघटनांचे पदाधिकारी यांना गोपनीयपणे दिली दिल्याने बुधवारी शहरातील पानटपऱ्या बंद होत्या. आयुक्त गडचिरोलीतून जाईपर्यंत पानटपरी उघडल्या नाही, याची आज शहरात दिवसभर चर्चा होती. आयुक्त महेश झगडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात गुटखा, पानमसाला व तत्सम पदार्थ प्रतिबंध या विषयावर चर्चासत्रात ‘सोफेशिष्टीकेटेट’ लोकांना मार्गदर्शनाचा डोज दिला. या कार्यक्रमाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी रणजीतकुमार होते. तर चर्चासत्रात मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, सहाय्यक जिल्हाधिकारी देवेंद्रसिंह, पोलीस अधीक्षक सुवेझ हक, उपपोलीस अधीक्षक डी. बी. इलमकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर. एस. फारूखी, अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त यो. को. बेंडकुळे, आरोग्य विभागाचे जवळेकर, डॉ. गौतम, समाजकल्याण आयुक्त टी. डी. बरगे, विलास निंबोरकर, डॉ. शिवनाथ कुंभारे, मनोहर हेपट, निसार, अनिल केंद्रे आदी उपस्थित होते. या चर्चासत्रात महेश झगडे यांनी १५ आॅगस्टपासून जिल्हा तंबाखूमुक्त करण्याचे आवाहन केले. राज्यात ३६ कोटी रूपयाचा गुटखा जप्त करण्यात आल्याचे सांगितले. तसेच शाळा परिसरात गुटखा विक्री होत असल्यास शाळेतील मुख्याध्यापक व राजपत्रित अधिकाऱ्यांना विक्री करणाऱ्याला दंड करण्याचे अधिकार राज्य सरकारने दिले आहेत, अशी माहिती दिली.डॉ. अभय बंग यांनी गेल्या आठ वर्षाच्या सर्वेक्षणात जिल्ह्यात ५० टक्के महिलांमध्ये तंबाखू खाण्याचे प्रमाण आढळल्याचे सांगितले. ग्रामीण आरोग्य अभियान, रोहयो, बालविकास प्रकल्प यावर होणाऱ्या खर्चापेक्षा तंबाखूवर होणारा खर्च जास्त आहे. शालेय विद्यार्थ्यांचे तंबाखू खाण्याचे प्रमाण ३३ टक्के असल्याचेही ते म्हणाले. सूत्रसंचालन योगेश नाथे यांनी तर आभार यो. को. बेंडकुळे यांनी मानले. (जिल्हा प्रतिनिधी)
आयुक्ताचा दौरा, पानटपऱ्या कुलूप बंद
By admin | Updated: July 23, 2014 23:36 IST