मान्यवरांचे आवाहन : दत्तक ग्राम कासवी येथील ग्रामसभेत गाव विकासावर झाली चर्चाआरमोरी : कासवी गावातील आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक स्तर उंचाविण्यासाठी रोजगार क्षेत्रात संधी निर्माण करणे आवश्यक आहे. गावाच्या सर्वांगिण विकासासाठी सर्व गावकऱ्यांनी पुढे यावे, असे आवाहन महात्मा गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांनी केले. गडचिरोली गोंडवाना विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व. न. पं. वाणिज्य महाविद्यालय आरमोरीने दत्तक ग्राम योजनेंतर्गत तालुक्यातील कासवी हे गाव विकासासाठी दत्तक घेतले. या अनुषंगाने समन्वय समितीच्या उपस्थितीत शनिवारी कासवी येथे ग्राम पंचायतीच्या सभागृहात पहिली ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी डॉ. खालसा बोलत होते. यावेळी मंचावर कासवीच्या सरपंच पुष्पलता तिवाडे, उपसरपंच प्रवीण रहाटे, ग्रामसेवक जवंजालकर उपस्थित होते. या ग्रामसभेत कासवी गावाच्या विकासासंदर्भात सर्व क्षेत्राच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. गावकऱ्यांनी महाविद्यालय व विद्यार्थ्यांना सहकार्य करून कासवी गावाचा कायापालट करण्यासाठी नेहमी सहकार्याची भूमिका बजावावी, असे आवाहन सरपंच पुष्पलता तिवाडे व उपसरपंच प्रवीण रहाटे यांनी केले. याप्रसंगी दत्तक ग्राम विकासासाठी संयुक्त कार्यकारिणी गठित करण्यात आली. कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा तर सदस्य म्हणून सरपंच पुष्पलता तिवाडे, उपसरपंच प्रवीण रहाटे, रितेश सडमाके, आशा कानतोडे, आसाराम प्रधान, अजय गुरनुले, शेषराव कुमोटी, चंद्रकांत दोनाडकर, उदाराम दिगोरे, प्रा. शशिकांत गेडाम, प्रा. ज्ञानेश ठाकरे, प्रा. गंगाधर जुआरे, प्रा. डॉ. अमिता बन्नोरे, प्रा. डॉ. विजय गोरडे, प्रा. मेश्राम यांचा समावेश आहे. संचालन प्रा. शशिकांत गेडाम यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)
गावाच्या विकासासाठी पुढे या
By admin | Updated: December 9, 2015 01:57 IST