गडचिरोली व कुनघाडा रै. येथे स्पर्धा : शृंखला, खुशबू, इशा, अभिषेक, आदित्य, वैष्णवी ठरल्या प्रथमगडचिरोली : लोकमत बाल विकास मंचच्या वतीने कुनघाडा रै. व गडचिरोली येथे अनुक्रमे शुक्रवारी व शनिवारी घेण्यात आलेल्या आकाश दिवे तयार करण्याची स्पर्धा व विविध स्पर्धांना बालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. बालकांनी विविध प्रकारच्या रंगाचे आकाश दिवे साकारत आपल्या प्रतिभेची चुणूक दाखविली. गडचिरोली येथील गोकुलनगरातील गणेश मंदिरात घेण्यात आलेल्या आकाश दिवे तयार करण्याच्या स्पर्धेत प्रथम गटात कारमेल हायस्कूलची शृंखला कापकर हिने प्रथम क्रमांक पटकाविला. तर द्वितीय क्रमांक रामपूरी न. पं. शाळेची ठेंगे हिने पटकाविला. दुसऱ्या गटात शिवाजी हायस्कूलची खुशबू निकोसे हिने प्रथम तर द्वितीय क्रमांक पलक कुंभारे, तृतीय क्रमांक मैथिली डोईजड हिने पटकाविला. प्रोत्साहन बक्षीस उत्कर्ष सोरते याला देण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लता चडगुलवार होत्या. प्रमुख अतिथी म्हणून कुनघाडा जि. प. शाळेच्या शिक्षिका कुंभारे, स्पर्धेचे परिक्षक संत जगनाडे न. प. उच्च प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कुसूम भोयर होत्या. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना लोकमत बाल विकास मंचच्या वतीने बक्षीस देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन व आभार बाल विकास मंचच्या संयोजिका किरण पवार यांनी मानले. कुनघाडा येथे लोकमत बाल विकास मंच तसेच श्री व्यंकटेश कॅम्प्युटर एज्युकेशनच्या वतीने शुक्रवारी घेण्यात आलेल्या आकाश दिवा तयार करणे, चित्रकला व शुभेच्छापत्र तयार करण्याच्या स्पर्धेत बालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जि. प. केंद्रीय व कन्या शाळा कुनघाडा रै. येथे पार पडलेल्या इयत्ता पाचवी ते सातवी या गटात आकाश दिवा स्पर्धेत प्रथम क्रमांक इशा रघुनाथ कुनघाडकर, चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक अभिषेक शामराव कुनघाडकर, शुभेच्छापत्र तयार करण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक आदित्य राजू लटारे व वैष्णवी गणेश राजूवार यांनी पटकाविला. विजेत्यांना बाल विकास मंच व कॅम्प्युटर एज्युकेशनच्या वतीने प्रमाणपत्र व बक्षीस देऊन गौरविण्यात आले. यशस्वीतेसाठी वैभव दुधबळे, योगेश भांडेकर, शिरीष खोबे, अंजुम शेख, देविकर यांनी सहकार्य केले.
विद्यार्थ्यांनी साकारले रंगबिरंगी आकाश दिवे
By admin | Updated: November 10, 2015 02:08 IST