कुरखेडा : कुरखेडा येथील मंजूर काेराेना उपचार केंद्र एका दिवसात सुरु करावे, या मागणीसाठी साेमवारी दुपारी १२ वाजता शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल यांच्या नेतृत्वात कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयावर धडक देण्यात आली. नागरिकांच्या या आंदाेलनाची दखल घेऊन काेविड उपचार केंद्र सुरू करण्यात आले.
कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात ७ एप्रिल रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सभेत २० बेडचे व्हेंटिलेटर, ऑक्सिजनसहित कोरोना उपचार केंद्र मंजूर करण्यात आले. काेरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी फिजिशियन डॉ. डोंगरे यांची नियुक्ती कुरखेडा रुग्णालयात आहे. परंतु, त्यांना सामान्य रुग्णालयात प्रतिनियुक्ती दिली आहे. त्यामुळे कुरखेडाचे केंद्र वाऱ्यावर होते. संशयास्पद रूग्णांचे विलगीकरण करण्यात येते. या केंद्रात तात्पुरते उपचार केल्याने रुग्णाची तब्येत गंभीर होते. दरम्यान, दुपारी १२ वाजता शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल यांच्या नेतृत्वात उपजिल्हा रुग्णालयावर धडक देण्यात आली. पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांनी मध्यस्थी करून आंदोलनकर्त्यांची वैद्यकीय अधिकारी डॉ. कमलेश परसवानी यांची भेट घालून दिली व चर्चा करण्यात आली. हे उपचार केंद्र आजच सुरू करा, डॉ. डोंगरे यांची प्रतिनियुक्ती रद्द करा, रुग्णांना उपचार मंजूर असलेल्या ऑक्सिजन बेडवर द्या, आदी मागण्या एका तासाच्या चर्चेत मंजूर करण्यात आल्या. नंतर आंदोलनकर्त्यांना २० बेडचे व्हेंटिलेटर, ऑक्सिजनसहित सुसज्ज वार्ड दाखविण्यात आले. सध्या व्हेंटिलेटरची गरज पडत नाही. तसेच रेमडेसिविर इंजेक्शनही देण्यात यावे, अशी मागणी केली असता, १० इंजेक्शनची व्यवस्था आहे. पुन्हा अधिकचा साठा मागवू, असे सांगण्यात आले. जिल्हास्तरावर जे उपचार होतात ते इथं करू. आजपासूनच आम्ही वार्डात उपचार सुरू केले आहेत. तसेच उपचार सुरु असलेला एक बाधित रुग्णही दाखविण्यात आला. अखेर मागणी पूर्ण झाल्याने हे घेराओ आंदोलन थांबविण्यात आले. यावेळी शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख आशिष काळे, काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष जयंत हरडे, नगरसेवक पुंडलिक देशमुख, विजय पुस्ताेडे, प्रभाकर शिवालावर, राकेश सहारे, आदी उपस्थित होते.