पळसगावात कार्यक्रम : बाळू धानोरकर यांचे प्रतिपादनआरमोरी : दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणाच्या ओझ्याखाली दबून आत्महत्या केलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मुले दत्तक घेऊन त्यांचे शिक्षण व मुलीच्या लग्नाचा खर्च उचलणार, असे अभिवचन वरोरा विधानसभा क्षेत्राचे आ. बाळू धानोरकर यांनी दिले. आरमोरी तालुक्यातील पळसगाव येथे सार्वजनिक कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी शिवसेनेचे गडचिरोली जिल्हा संपर्क प्रमुख विलास चावरी होते. प्रमुख अतिथी म्हणून शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख हरीश मने, माजी आ. डॉ. रामकृष्ण मडावी, जि. प. सदस्य लक्ष्मी मने, योगराज कुथे, विलास ढोरे, अमर खरवडे, शिवसेना तालुकाप्रमुख कवडू सहारे, डॉ. संजय कन्नमवार, पं. स. सदस्य सचिन महाजन, नानू चुधरी, कल्पना तिजारे, मंगरू वरखडे, सोमनानी आदी उपस्थित होते. पुढे बोलताना आ. बाळू धानोरकर म्हणाले की, विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा सध्या चिंतेचा विषय आहे. यावर्षीच्या दुष्काळाने शेतकरी होरपळून निघाला आहे. संपूर्ण राज्य दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी शिवसेनेकडून केली जात आहे. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शिवसेना नेहमीच प्रयत्नरत आहे. शेतकऱ्यांनी संकटाचा हिंमतीने सामना करावा, असे आवाहन आ. धानोरकर यांनी केले. संचालन राऊत तर आभार मंगरू वरखडे यांनी मानले. (वार्ताहर)
आत्महत्याग्रस्तांची मुले दत्तक घेणार
By admin | Updated: January 23, 2016 01:48 IST