लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : येथील 'स्पर्श' संस्थेच्या पुढाकाराने जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जिल्हा पोलिस दल आणि चाईल्डलाईन सोबत गुरुवारी राबविलेल्या संयुक्त अभियानात आरमोरी शहरातील बालकामगारांची सुटका करण्यात आली. आरमोरी शहरात राबविण्यात आलेल्या या मोहिमेत ९ बालमजुरांची सुटका करण्यात पथकाला यश आले. बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले व स्पर्श संस्थेच्या प्रकल्प समन्वयक विजया पाटील यांनी या पथकाचे नेतृत्व केले.
या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी स्पर्श संस्थेचे समन्वयक लुकेश सोमणकर, समुदाय सामाजिक कार्यकर्ता नयुष सहारे, दिनेश राऊत, अली आझम, राहुल बारसागडे, चाईल्डलाईनचे शुभम निकोडे, रितेश ठमके, पोलिस स्टेशन आरमोरीचे शिपाई लकी मामुलकर आदींनी सहकार्य केले. विशेष म्हणजे, यावेळी आरमोरी पोलिसांकडून बंदोबस्त देण्यात आला
जिल्हाभर धाडसत्र सुरू राष्ट्रीय बाल हक्क आयोगाच्या निर्देशानुसार बालमजूर प्रतिबंधक अभियान सुरू आहे. या अभियानाअंतर्गत बालकांची वेठबिगारीच्या तावडीतून सुटका करण्यासाठी जिल्ह्यात धाडसत्र राबविण्यात येत आहेत.
९ गडचिरोलीतूनही केली होती बालकांची सुटकाबाल मजुरांची हॉटेल व आस्थापनाच्या वेठबिगारीच्या तावडीतून सुटका करण्यात आली. तसेच शहरातील सर्व व्यापाऱ्यांना बाल मजूर न ठेवण्याच्या कडक सूचना यावेळी आस्थापना मालकांना देण्यात आल्या.
बालमजुरी विरोधात समाजात हवा आक्रोश
- १८ वर्षांखालील बालकांना कोणत्याही प्रकारच्या कामावर ठेवणे हा कायद्याने गुन्हा आहे, हे माहीत असून देखील अनेक आस्थापनांचे मालक कमी मोबदल्यात अधिक श्रम करणारा व्यक्ती म्हणून बालकांना कामावर ठेवतात.
- बालकांपासून त्यांचे बालपण हिरावून घेणे हा अतिशय घृणास्पद प्रकार आहे. केवळ कायदा करून बालमजुरी संपणार नाही तर आता समाजात बालमजुरी विरोधात आक्रोश निर्माण होणे काळाची गरज आहे, असे स्पर्श संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिलीप बारसागडे यांनी सदर मोहीम राबविताना उपस्थितांना सांगितले.