एटापल्लीत मेळावा : रमेशचंद्र दहिवडे यांचा आरोपएटापल्ली : देशाची भावी पिढी घडविण्याचे महत्त्वाचे काम बाल विकास विभागाकडे आहे. मात्र या विभागाकडे केंद्र व राज्य शासनाचे दुर्लक्ष होत आहे. या विभागाच्या योजनांवरील खर्च दिवसेंदिवस घटत चालला आहे. हे धोरण अन्यायकारक असून या विरोधात तीव्र लढा उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष रमेशचंद्र दहिवडे यांनी केले. एटापल्ली येथे अंगणवाडी महिलांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी छाया कागदेलवार, सलेस्तीना कुजूर, सुवर्णा सरकार, मोनिका बिश्वास, निलीमा बेडके, अनुसया झाडे यांच्यासह एटापल्ली तालुक्यातील इतर अंगणवाडी कर्मचारी सदर मेळाव्याला उपस्थित होते. पुढे बोलताना रमेशचंद्र दहिवडे म्हणाले की, गेल्या ४० वर्षाच्या कार्यकाळात अंगणवाडी महिलांना पाच वर्ष तर कधी तीन वर्षाच्या अंतराने मानधनात वाढ होत होती. मात्र पहिल्यांदाच पाच वर्षांचा कालावधी उलटूनही अंगणवाडी महिलांच्या मानधनात वाढ करण्यात आली नाही. यावरून अंगणवाडी महिलांबाबत तसेच या विभागाच्या मार्फतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत शासन फारसे गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीच्या वेळी अनेक फसव्या घोषणा देऊन केंद्र व राज्यातील सरकार सत्तेवर आले. आता या सर्व घोषणांचा विसर पडला आहे. केंद्र शासनाला त्यांच्या घोेषणांची आठवण करून देण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी तसेच देशभरातील इतर कर्मचारी व नागरिकांनी व्यापक जनआंदोलन उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. प्रास्ताविक भाषणात गुलशन शेख यांनी अंगणवाडी महिलांना सेवानिवृत्तीचा लाभ देण्यात आला नाही. अल्पसे मानधन दिले जाते. ते देखील नियमित दिले जात नाही. छाया कागदेलवार यांनी अंगणवाडी महिलांना किमान वेतन देण्याची मागणी मेळाव्यादरम्यान केली. (तालुका प्रतिनिधी)
बाल विकास विभागाकडे केंद्र शासनाचे दुर्लक्ष
By admin | Updated: February 20, 2017 00:42 IST