१७८ उमेदवारांचे अर्ज : समर्थकांच्या गर्दीने तहसील परिसर फुलला चामोर्शी : जिल्ह्यात सर्वाधिक नऊ जिल्हा परिषद क्षेत्र व १८ पंचायत समिती गण असलेल्या चामोर्शी तहसील कार्यालयात नामांकनपत्र दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी बुधवारी उमेदवार व शेकडो समर्थकांची एकच गर्दी झाली होती. दिवसभरात चामोर्शी येथे ६० उमेदवारांनी जिल्हा परिषदेसाठी तर ९१ उमेदवारांनी पंचायत समितीसाठी आपले अर्ज दाखल केले आहेत. आतापर्यंत चामोर्शी तालुक्यात ९ जिल्हा परिषद क्षेत्राकरिता ७२ उमेदवारांचे अर्ज तर पंचायत समितीकरिता १०६ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहे. भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना याशिवाय रासपप्रणीत जनसेवा आघाडीच्या उमेदवारांनी चामोर्शी तालुक्यात उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. विविध राजकीय पक्ष व अपक्ष उमेदवारांनी ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक काढून आपले शक्ती प्रदर्शन करीत नामांकन अर्ज दाखल केलेत. त्यामुळे सकाळपासूनच चामोर्शी तहसील कार्यालयात उमेदवारांची गर्दी झाली होती. मंगळवारी अनेक उमेदवारांचे आॅनलाईन अर्ज राज्य निवडणूक आयोगाचा सर्वर डाऊन असल्याने प्रिंट मिळण्यास अडचण येत होती. ही अडचण बुधवारी दूर झाल्याचे दिसून आले. चामोर्शीत उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपचे आमदार डॉ. देवराव होळी उपस्थित होते. त्यांनी सर्व उमेदवारांचे पक्षाचे एबी फॉर्म उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जी. एम. तळपादे यांच्याकडे सादर केले. यावेळी होळी यांच्या समावेत भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद पिपरे, गडचिरोलीच्या नगराध्यक्ष योगीता पिपरे, बाबुराव कोहळे आदी उपस्थित होते. रासप, जनसेवा आघाडी अतुल गण्यारपवार यांच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. (शहर प्रतिनिधी)
चामोर्शीत एकाच दिवशी १५१ उमेदवारी अर्ज दाखल
By admin | Updated: February 2, 2017 01:21 IST