मनपा निवडणुकीसाठी व्यवस्था : एक महिन्याने परीक्षा पुढे ढकलल्यागडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत उन्हाळी २०१७ च्या परीक्षेच्या वेळापत्रकात चंद्रपूर शहर महानगर पालिका निवडणुकीच्या कारणाने बदल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे १८ एप्रिलपासून सुरू होणारी उन्हाळी परीक्षा आता मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होणार आहे. वेळापत्रक बदलेल्या अभ्यासक्रमामध्ये बी. फार्म. सह सर्व अभ्यासक्रमांचा समावेश आहे. यासंदर्भात गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर यांच्या आदेशान्वये परीक्षा विभाग प्रमुख डॉ. जे. व्ही. दडवे यांनी अधिसूचना जारी केली आहे. यात म्हटले आहे की, चंद्रपूर शहर महानगर पालिकेची निवडणूक ११ एप्रिल २०१७ रोजी घोषित करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या उन्हाळी २०१७ च्या सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा १८ ते १९ एप्रिलपासून सुरू होणार होत्या. विद्यापीठाने यापूर्वीच तसे वेळापत्रकही जाहीर केले होते.आता मनपा निवडणुकीच्या कारणाने गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. परीक्षा केंद्र व वेळ यात कोणताही बदल करण्यात आला नाही, असे परीक्षा विभाग प्रमुख डॉ. दडवे यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)असा आहे वेळापत्रकातील बदलबी.फॉर्म व्यतिरिक्त सर्व अभ्यासक्रमाच्या उन्हाळी २०१७ च्या परीक्षा १८ एप्रिल तर काही अभ्यासक्रमाच्या परीक्षा १९ एप्रिलपासून सुरू होणार होत्या. यात बदल करण्यात आला असून १८ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या परीक्षा आता २२ मे आणि १९ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या परीक्षेस २३ मे पासून सुधारित वेळापत्रकानुसार प्रारंभ होणार आहे.पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणे बी.फार्म अभ्यासक्रमाची उन्हाळी २०१७ ची परीक्षा १८ एप्रिलपासून सुरू होणार होती. मात्र आता वेळापत्रकात बदल करण्यात आला असून सदर अभ्यासक्रमाची परीक्षा २९ मे पासून सुरू होणार आहे. सुधारित वेळापत्रकानुसार गोंडवाना विद्यापीठाने सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा तब्बल एक महिन्याने पुढे ढकलल्या आहेत.
विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकात बदल
By admin | Updated: April 11, 2017 01:00 IST