लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : आदिवासी नागरिकांनी भारतीय राज्यघटनेच्या मार्गाने समाजात बदल घडवावा, असे आवाहन विदर्भ राज्य आघाडीचे प्रमुख श्रीहरी अणे यांनी केले.तालुक्याच्या मंगेवाडा येथे इलाका ग्रामसभा व इलाक्यातील सर्व ग्रामसभेच्या संयुक्त विद्यमाने गोंडवाना वीर क्रांतीकारी शहीदांना श्रध्दांजली, गोंडवाना गोटूल महासंमेलन व भूमकाल दिवसाचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. सदर महासंमेलनात तालुक्यातील ४४ ग्रामसभांनी सहभाग नोंदविला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंगेवाडाचे पोलीस पाटील सुनील कुमरे, विशेष अतिथी म्हणून विदर्भ राज्य आघाडीचे कार्याध्यक्ष निरज खांदेवाल, अनिल जवादे, तर प्रमुख अतिथी म्हणून केशर शहा सयाम, जि.प. सदस्य अनिल केरामी, सुरसुंडीचे सरपंच श्रीराम गेडाम, गोंडवाना गोटूल सेनेचे मुकेश नरोटे, वनरक्षक गुरू वाढई आदी मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलताना श्रीहरी अणे म्हणाले, सरकार व पोलीस आपली अयशस्वीता लपविण्याकरिता आदिवासींना पळवून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करतात. कलम ११० चा गैरवापर होत आहे. आदिवासी समाज विखुरलेला असल्याने आदिवासींवर अन्याय होत आहे. नक्षल भागात गुन्हे घडले की, आदिवासींना पकडून नेले जाते. कलम ११० च्या गैरवापराबद्दल सर्व ग्राम पंचायतीने ठराव घेऊन संघटनेच्या माध्यमातून कोर्टात याचिका दाखल करावी. अहिंसेचा मार्ग अवलंबून घटनेच्या मार्गाने समाजात बदल घडवावा, असे त्यांनी सांगितले.आदिवासी समाजाने आपली अस्मिता विसरू नये. आपल्या गोंडी संस्कृतिची जतन करावे, मुंबई-दिल्लीचे सरकार आपले प्रश्न सोडवू शकत नाही. आदिवासी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी विदर्भ राज्य होणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारच्या खोट्या भूलथापांना बळी न पडता, विदर्भ राज्याच्या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.निरज खांदेवाल यांनीही मार्गदर्शन केले. या महासंमेलनाला इलाक्यातील आदिवासी महिला, पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन ग्रामसभा कार्याध्यक्ष ईश्वर कुमरे यांनी केले.
घटनात्मक मार्गाने समाजात बदल घडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 01:27 IST
आदिवासी नागरिकांनी भारतीय राज्यघटनेच्या मार्गाने समाजात बदल घडवावा, असे आवाहन विदर्भ राज्य आघाडीचे प्रमुख श्रीहरी अणे यांनी केले.
घटनात्मक मार्गाने समाजात बदल घडवा
ठळक मुद्देश्रीहरी अणे यांचे आवाहन : मंगेवाडात भूमकाल दिवस व गोंडवाना महासंमेलन उत्साहात