आठ दिवसानंतर कारवाई : गडचिरोली पोलिसांच्या तपासावर शंकागडचिरोली : येथील जिल्हा पोलीस मुख्यालयात विशेष पोलिस अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या जिजा बंडू हेडो या युवतीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर गडचिरोली पोलिसांनी प्रकरणाचा तपास करून पोलीस शिपाई रामजी तिम्मा व त्याची पत्नी या दोघांच्या विरोधात सोमवारी रात्री कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. जिजा बंडू हेडो हीचा १ डिसेंबर रोजी संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला होता. गडचिरोली पोलिसांनी मात्र जिजाच्या मृत्यूबाबत केवळ मर्ग दाखल करून ठेवला होता. जिजाच्या मृत्यूबाबतची बातमी माध्यमांमध्ये प्रकाशित झाली. यामध्ये जिजाच्या मृत्यूसाठी पोलीस शिपाई व त्याची पत्नी जबाबदार असल्याचेही वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्तानंतर मात्र गडचिरोली पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली. आठ दिवस मर्ग दाखल करून काहीच घडले नाही, असे पोलीस विभागाकडून भासविण्यात येत होते. दरम्यान, सोमवारी रात्री पोलिसांनी पोलीस शिपाई रामजी तिम्मा व त्याची पत्नी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. मात्र वृत्त लिहिपर्यंत तिम्मा व त्याची पत्नी या दोघांनाही पोलिसांनी अटक केली नव्हती. त्यामुळे या तपासात गडचिरोली पोलिसांच्या भूमिकेबाबतही नागरिकांकडून संशय व्यक्त केला जात आहे. (नगर प्रतिनिधी)
एसपीओ हत्येप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल
By admin | Updated: December 9, 2015 01:51 IST