आलापल्ली : जलयुक्त शिवार योजनेंतर्गत शेततळे, मजगी व इतर बांधकामांसाठी अहेरी उपविभागात प्रकाशित व उपलब्ध न होणाऱ्या वृत्तपत्रातून जाहिरात दिल्यामुळे कंत्राटदारांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे सदर निविदा रद्द करावी व निविदेतील नेमून दिलेल्या दर्जापेक्षा उच्च दर्जाच्या कंत्राटदारांना कंत्राट द्यावे, अशी मागणी आलापल्ली कंत्राटदार असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. ५ फेब्रुवारी रोजी वृत्तपत्रातून निविदा प्रकाशित करण्यात आली. परंतु सदर वृत्तपत्र अहेरी परिसरात उपलब्ध होत नाही. त्यामुळे कंत्राटदारांना याची माहिती मिळाली नाही. त्यामुळे कंत्राटदारांना वंचित राहावे लागत आहे. कृषी विभागाच्या कार्यालयातून याबाबत कुठल्याही प्रकारची माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे हा निर्णय अन्यायकारक असून कामाचे नियोजित दर्जापेक्षा उच्च दर्जाच्या कंत्राटदारांनाही कंत्राट देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी अध्यक्ष मोहम्मद इशाक शेख, उपाध्यक्ष एल. एम. गद्देवार, एस. बी. चन्ने, रोषरेड्डी, बंडमवार, प्रशांत मद्दिवार यांनी केली आहे. (वार्ताहर)
शेततळे, मजगी व इतर बांधकामांची निविदा रद्द करा
By admin | Updated: March 8, 2016 01:29 IST