जिल्ह्यात प्रथमच प्रयोग : सोमवारपासून प्रारंभ; जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वपूर्ण निर्णयदिलीप दहेलकर गडचिरोलीजिल्ह्यातील खाणपट्टाधारकांना गौणखनिजाचे उत्खनन करण्यासाठी दिलेल्या जिल्ह्यातील २९ गौण खनिज खाणींची प्रथमच ईटीएस मशीनद्वारे मोजणी करण्यात येणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धडकले असून जिल्हा खनिकर्म विभागाच्या वतीने या मोजणी व सर्वेक्षणाच्या कामाचे नियोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, महसूल विभागाचे कर्मचारी व भूकरमापकांकडून सोमवारपासून खाणीच्या मोजणीच्या कामाला प्रारंभ होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देसाईगंज, आरमोरी, कुरखेडा, गडचिरोली व चामोर्शी या पाच तालुक्यातील दगड, मुरूम, माती असलेल्या एकूण २९ खाणी उत्खननासाठी खाणपट्टाधारकांना देण्यात आल्या आहेत. या खाणीतून गौण खनिजाचे उत्खनन व वाहतूक सुरू आहे. मात्र संबंधित खाणपट्टाधारकाने रॉयल्टीच्या प्रमाणात गौणखनिजाचे उत्खनन केले आहे काय? अथवा त्यापेक्षा अधिक गौणखनिजाचे उत्खनन केले आहे. हे तपासण्यासाठी जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी प्रथमच ईटीएस मशीनद्वारे गौणखनिज खाणीची मोजणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. तसे निर्देशही अधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यानुसार अप्पर जिल्हाधिकारी महेश आव्हाड यांनी तत्काळ पत्र काढून खनिकर्म विभागाच्या अधिकाऱ्यांना या मोजणीच्या कामाचे नियोजन करण्याचे आदेश दिले.त्यानुसार जिल्हा खनिकर्म विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महसूल व भूमीअभिलेख विभागाचे कर्मचारी यांचे पथक या कामासाठी नियुक्त करून सदर मोजणीचे काम करण्याचे निर्देश दिले. संबंधित तलाठी व भूकरमापकांना या खाणींची मोजणी करताना सातबारा, गाव नकाशाची प्रत देण्यात येणार आहे. मोजणीच्या वेळी विहित कार्यपध्दती करणे, स्थळ, पंचनामा व जबाब आदी कार्यवाही करण्यात येणार आहे.
२९ खाणींची ईटीएसद्वारे होणार मोजणी
By admin | Updated: June 13, 2016 02:45 IST