अनिल सोले यांचे प्रतिपादन : गडचिरोलीत जनजागृती रॅलीगडचिरोली : पर्यावरण संवर्धनात वृक्षांचे अनन्य साधारण महत्त्व आहे. औद्योगिकरणामुळे वाढलेले प्रदुषण लक्षात घेता वृक्ष लागवड करणे व त्यांचे संर्वधन करणे ही प्रत्येक नागरिकाने स्वत:चे कर्तव्य मानले पाहिजे. वृक्ष लागवड व संवर्धन ही लोकचळवळ निर्माण झाली पाहिजे, त्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने जनजागृती करावी, असे प्रतिपादन आमदार प्रा. अनिल सोले यांनी केले. उपवनसंरक्षक कार्यालय गडचिरोलीच्या वतीने वृक्ष लागवडीबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी गुरूवारी वृक्षदिंडी व रॅली काढण्यात आली. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना आमदार प्रा. अनिल सोले बोलत होते. यावेळी खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, मुख्यवनसंरक्षक पी. कल्याणकुमार, उपवनसंरक्षक लक्ष्मी अनबत्तुला, रवींद्र ओल्लावार आदी मान्यवर उपस्थित होत. पुढे बोलताना आमदार सोले म्हणाले की, आपल्या राज्यात वनांचे आच्छादन १७ टक्के आहे. वास्तविक पाहता, जमिनीच्या किमान ते ३३ टक्के असायला पाहिजे. दिवसेंदिवस विविध कारणांमुळे जंगलाचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. परिणामी दुष्काळ, प्रदुषण, अकाली पाऊस, तसेच विविध आजारांना संमोर जावे लागत आहे. प्रत्येक जण जन्मापासून ते मृत्यूपर्यंत पाच कोटी रूपये मुल्याचे आॅक्सीजन ग्रहण करतो. या विनामुल्य मिळणाऱ्या आॅक्सीजनची परतफेड म्हणून त्याचबरोबर भावी पिढीला पुरेशा प्रमाणात आॅक्सीजन मिळावे यासाठी येत्या १ जुलैला प्रत्येकाने एक झाड लावून ते जगवावे, असे आवाहन केले. संचालन प्रशांत खाडे, तर आभार सुनिल पेंदोरकर यांनी मानले. कार्यक्रमाला कारमेल हायस्कूलचे विद्यार्थी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
गावात वृक्ष संवर्धनाची लोकचळवळ निर्माण करा
By admin | Updated: June 24, 2016 01:57 IST