गडचिरोली : शेतीच्या वादातून राग अनावर झाल्याने सख्खा भाऊ व पुतन्याने मिळून दुसऱ्या भावाला काठीने डोक्यावर मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना शनिवारी तालुक्यातील गुरवळा (राखी) येथे घडली. या घटनेत सुरेश देवाजी गेडाम (५५) रा. गुरवळा हे जखमी झाले तर त्यांना मारहाण करणाऱ्या आरोपींमध्ये रमेश देवाजी गेडाम (५०), रंजित रमेश गेडाम (२५) रा. गुरवळा यांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरवळा येथील सुरेश देवाजी गेडाम हे आपल्या घरी एकटचे होते. त्यावेळी त्यांचा भाऊ रमेश गेडाम व त्याचा मुलगा रंजित गेडाम हे दोघेही दारूच्या नशेत सुरेशच्या घरी आले. या दोघांनी सुरेश गेडाम यांच्यासोबत शेतीवरून वाद घातला. सदर वाद विकोपाला गेल्याने सुरेशला बापलेकांनी काठीने जबर मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाले व त्यांना रक्तस्त्राव होऊ लागला. कुटुंबीयांनी सुरेश गेडाम यांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेसंदर्भात गडचिरोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)
शेतीच्या वादातून भावानेच केला भावावर हल्ला
By admin | Updated: December 16, 2015 01:49 IST