दोन वर्षे उलटली : पदहूरवासीयांना पायवाटेचाच आधार लोकमत न्यूज नेटवर्क भामरागड : तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या पदहूर गावाकडे जाणाऱ्या मार्गावर मागील तीन वर्षांपूर्वी दोन ठिकाणी पुलांचे बांधकाम करण्यात आले. मात्र तीन वर्षे उलटूनही सदर मार्गांवर पक्का रस्ता बनविण्यात आला नाही. त्यामुळे पदहूर गावातील नागरिकांना पायवाटेनेच प्रवास करावा लागत आहे. या गावातील नागरिक पक्का रस्ता होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. पदहूर येथे २० ते २५ घरांची वस्ती आहे. गावात १५० वर आदिवासी, माडिया जमातीचे कुटुंब वास्तव्यास आहेत. कोठी- भामरागड मुख्य मार्गावर बायपास तीन ते चार किमी अंतरावर डोंगरदऱ्यांत पदहूर गाव वसले आहे. तीन किमीवर रस्त्याचा अभाव असल्याने बैलबंडी अथवा सायकलनेच किंवा पायीच पिडमिली येथे पोहोचल्यानंतर रस्ता दिसून येतो. पावसाळ्यात या मार्गावरील अनेक नाले भरून वाहत असल्याने अनेकदा संपर्क तुटतो. सदर मार्गावर दोन ठिकाणी पुलाचे बांधकाम करण्यात आले. त्यानंतर लगेच रस्ता बांधला जाईल, अशी आशा पदहूरवासीयांमध्ये निर्माण झाली होती. जंगलात लाखो रूपयांचा खर्च करून दोन पुलांचे बांधकाम करण्यात आले. मात्र या मार्गे जाण्याकरिता पक्का रस्ताच नसल्याने पूल होऊनसुद्धा निरूपयोगी ठरत आहे.
पूल बांधले मात्र रस्त्याचा पत्ता नाही
By admin | Updated: May 14, 2017 01:51 IST