जि.प. सीईओंकडे तक्रार : माहितीच्या अधिकारातून उघडकीस आला सदर प्रकारदेसाईगंज : तालुक्यातील कुरूड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत तुळशी उपकेंद्रातील कार्यरत एका आरोग्य सेविकेने बोगस दैनंदिन दौर अहवाल तयार करून वेतन घेतले. सदर वेतन कुरूडच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काढून दिली. ही बाब माहितीच्या अधिकारातून उघडकीस आली आहे. या संदर्भात भाष्कर लोणारे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करून निलंबित करण्याची कारवाई केली आहे. या मागणीचे निवेदन भास्कर लोणारे यांनी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांना दिले आहे. प्राप्त माहितीनुसार तुळशी उपकेंद्रात कार्यरत आरोग्य सेविका प्रफुला महादेव अंबादे यांनी २३ सप्टेंबर २०१२ ला सकाळी ९ वाजता देसाईगंज पोलीस ठाण्यामध्ये जाऊन विष्णू वैरागडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. विष्णू वैरागडे यांच्यावर गुन्हा दाखल होईपर्यंत सकाळी ९ वाजतापासून ते ३ वाजेपर्यंत अंबादे या पोलीस ठाण्यातच होत्या, असे उपविभागीय दंडाधिकारी कुरखेडा व उपविभागीय पोलीस अधिकारी देसाईगंज यांच्या गोपनीय चौकशीत सिध्द झाले. प्रफूला अंबादे यांच्या तक्रारीवरून देसाईगंज पोलिसांनी विष्णू वैरागडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होईपर्यंत प्रफूला अंबादे ह्या देसाईगंज पोलीस ठाण्यातच होत्या. मात्र दुसरीकडे प्रफुला अंबादे यांनी कुरूड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक गहाणे यांना सादर केलेल्या सप्टेंबर २०१२ च्या दैनंदिन अहवालात २३ सप्टेंबर २०१२ चा दौरा दाखविला. या दिवशी सकाळी ८ ते २ वाजेपर्यंत तुळशी हेच मुख्यालय कार्यक्षेत्र दाखवून याच दिवशी याच वेळेस तुळशी गावात गृहभेटी बीएस-२, ओ.पी. वाटप, निरोध वाटप तसेच आठ रूग्णांच्या किरकोळ आजारावर उपचार केल्याचे अहवालात नमुद केले आहे. हा दैनंदिन दौरा अहवाल वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक गहाणे यांनी मंजूर केला असून प्रफुल अंबादे यांचे या दिवसाचे वेतनही काढल्याचे माहितीच्या अधिकारातून उघडकीस आले असल्याचे भाष्कर लोणारे यांनी जि.प. सीईओंना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. बोगस दौरा दाखवून वेतन घेणाऱ्या आरोग्य सेविका प्रफुला अंबादे व वेतन मंजूर करणारे डॉ. अशोक गहाणे या दोघांवरही फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी भाष्कर लोणारे यांनी तक्रारीत केली आहे.(तालुका प्रतिनिधी)
बोगस दौरा दाखवून वेतन काढले
By admin | Updated: July 21, 2014 23:51 IST