कुरखेडा : नगर पंचायतीची प्रभाग रचना व आरक्षण जाहीर झाल्यानंतर नगर पंचायत निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. कुरखेडा शहरात नगर पंचायतीची निवडणूक भाजप, शिवसेना, काँग्रेस व राकाँ हे प्रमुख चारही पक्ष स्वतंत्र लढणार असल्याचे निश्चित झाले आहे. शहरातील १७ ही वार्डात चारही पक्षाच्या नेत्यांकडून उमेदवारांची शोध मोहीम सुरू झाली आहे. राज्य सरकारमध्ये भाजप व शिवसेना ही युती संयुक्तपणे सहभागी असले तरी कुरखेडा शहरात मात्र भाजप व शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये विसंवादाचे वातावरण आहे. मागील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांनी स्वतंत्र पॅनल एकमेकांविरोधात उभे केले होते. याशिवाय दोन्ही पक्षांच्या वतीने समोरासमोर उघड प्रचार मोहीम राबविण्यात आली होती. आता होऊ घातलेल्या नगर पंचायत निवडणुकीमध्ये शहरातील १७ वार्डात चारही पक्षाकडून स्वतंत्र उमेदवार उभे करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अनेक ठिकाणी पक्षांच्या वतीने उमेदवारी निश्चित झाले आहे. नगर पंचायत निवडणुकीमध्ये युती किंवा आघाडी होण्याचे चिन्ह सध्यातरी दिसून येत नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या इतर पक्षाची आघाडी होण्याची शक्यता नाही. कुरखेडा नगर पंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना समान जागा देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र काँग्रेसच्या नेत्यांनी उमेदवारांच्या समान जागा देण्याची मागणी धुडकाविल्याने आघाडी होण्याबाबतची दोन्ही पक्षाच्या नेत्यांची चर्चा फिस्कटल्याची माहिती आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी सर्व १७ वार्डात उमेदवार निश्चित करण्यासाठी कंबर कसली आहे. यासाठी दोन्ही पक्षाकडून कानोसाही घेतल्या जात आहे. असे जरी असले तरी अद्याप काँग्रेस व राकाँ पक्षाच्या काही स्थानिक पदाधिकारी आघाडी करण्याबाबत आशावादी आहेत. त्यामुळे काँग्रेस, राकाँ आघाडी बाबत फिस्कटलेली चर्चा पुन्हा सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय अनेक नेत्यांचा आघाडी व युती करण्यास विरोध असल्याने आगामी नगर पंचायत निवडणुकीत भाजप, शिवसेना, काँग्रेस व राकाँ हे चारही पक्षांचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात समोरासमोर मैदान लढविणार असल्याची चिन्ह आहेत. (तालुका प्रतिनिधी)
भाजप, सेना, काँग्रेस, राकाँ स्वबळावर लढणार
By admin | Updated: September 2, 2015 01:12 IST