गडचिरोली : आरटीई २००९ नुसार शासनाने इयत्ता ६ ते ८ वी या वर्गासाठी तीन प्रशिक्षित शिक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बी.एड्. पदवीधर अर्हताधारक शिक्षक पदवीधर प्राथमिक शिक्षकपदी नियुक्ती मिळण्याची संधी उपलब्ध झाली. मात्र अचानक १३ फेब्रुवारी २०१३ च्या शिक्षक पात्रता परीक्षेचा शासन निर्णय पुढे करून या पदासाठी पदवी व डी.एड्. अर्हताधारक शिक्षक पात्र राहील, असा निर्णय घेण्यात आला. उच्च शैक्षणिक अर्हताधारण करणाऱ्या बी.ए., बी.एससी, बी.एड्. शिक्षकांना पदवीधर शिक्षकांच्या पदाला मुकावे लागणार आहे. त्यामुळे त्यांच्यात प्रचंड असंतोष पसरला आहे. राज्यात बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार इयत्ता पहिली ते पाचवी प्राथमिक व सहावी ते आठवी उच्च प्राथमिक अशा गटात विभागणी करण्यात आली आहे. २३ फेब्रुवारी २०१३ च्या शासन निर्णयान्वये उच्च प्राथमिक शाळेला पदवी व बी.एड्. अर्हतानिर्धारण करण्यात आले आहे. मात्र शिक्षण सचिवांचा हवाला देऊन गडचिरोली जिल्हा परिषदेत सेवा ज्येष्ठतेनुसार पदवी व डी.एड्. उत्तीर्ण असणाऱ्या शिक्षकांना पदवीधर प्राथमिक शिक्षक पदावर नियुक्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातील २६० उच्च अर्हताधारक बी.एड्. शिक्षकांना या पदापासून वंचित राहण्याची पाळी आली आहे. त्यामुळे उच्च शैक्षणिक अर्हताधारण करणाऱ्या शिक्षकांना शासनाच्या निर्णयाने मोठा धक्का पोहोचला आहे. परिणामी अनेक पदवीधारकांमध्ये असंतोष पसरला आहे. (शहर प्रतिनिधी)
बीएडधारक पदवीधर शिक्षक पदापासून दूरच
By admin | Updated: July 23, 2014 23:38 IST