गडचिरोली व्यापारी संघाचा उपक्रम : कारागृहात कार्यक्रमगडचिरोली : कैद्यांना भाजीपाला विकणे सोयीचे व्हावे, यासाठी गडचिरोली येथील व्यापारी मनोज देवकुले यांनी गुढीपाडव्याचे निमित्त साधून सायकल भेट दिली. येथील कारागृहात भाजीपाल्याची लागवड करण्यात आली आहे. सदर भाजीपाला शहरात विक्रीसाठी आणला जातो. मात्र कैद्यांकडे सायकल नसल्याने भाजीपाल्याची वाहतूक करण्यास अडचण निर्माण होत होती. ही बाब लक्षात घेऊन गडचिरोली व्यापारी संघाने कैद्यांना सायकल भेट दिली आहे. त्याचबरोबर गुढीपाडव्यानिमित्त सकाळच्या सुमारास पहाट पाडवा या कार्यक्रमातून भावगीते सादर करण्यात आली. कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ गडचिरोली व्यापारी संघाचे अध्यक्ष रवी चन्नावार यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली. कारागृह अधीक्षक डॉ. बी. एन. ढोले यांच्या हस्ते स्प्रिंकल सिस्टीमचे उद्घाटन करण्यात आले. गडचिरोली येथील प्रतिष्ठीत व्यापारी मनोज देवकुले यांच्या हस्ते ही सायकल भेट देण्यात आली आहे. रवी चन्नावार यांच्या हस्ते कारागृहातील बंदीजनांना टॉवेल वितरित करण्यात आले. यावेळी संघाचे पदाधिकारी गुरूदेव हरडे, मनोज देवकुले आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
बंदीजनांना भाजीपाला विक्रीसाठी सायकल भेट
By admin | Updated: April 9, 2016 00:59 IST