आष्टी येथील धान केंद्रावर शेतकऱ्यांना ताटकळत ठेवून बेकायदेशीरपणे धान खरेदी केल्याचे आढळून आले. तसेच खरेदी केंद्रावर धानाचे मोजमाप न करता आस्था काँटन जिंनिग येथील धरम काट्यावर मोजमाप करून थेट गोडाऊनमध्ये टाकला जात हाेता. कापसाच्या सातबारावर धान पेरा दाखवून धान खरेदी केले जात आहे. एकरी ९.६० क्विंटल धान खरेदीची मर्यादा असताना जास्त धान खरेदी करण्याचा गोरखधंदा चालू आहे. एका दिवसात सातबारा ऑनलाईन करून पैसे देणाऱ्या व्यापाऱ्याचा माल प्रथम खरेदी केल्याचा प्रकार समोर आला आहे.
शेतकऱ्यांना टोकन क्रमांकानुसार धान खरेदी करण्याचे सोडून शेतकऱ्यांचा माल खरेदी न करता त्यांना ताटकळत ठेवून व्यापाऱ्यांचा माल खरेदी केला जात असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे .
.या केंद्रावर १६ गावांच्या धान खरेदीला मान्यता असताना ६० गावांच्या धानाची नियमबाह्यपणे खरेदी करत असल्याचे आढळून आले आहे. २०२०-२१ च्या सातबारावर धान खरेदी करण्याचा नियम असताना बेकायदेशीरपणे २०१८-१९ च्या सातबारावर धान खरेदी केल्याची बाब समोर आली. तसेच या खरेदी केंद्रावर महामंडळाचा कनिष्ठ सहायक विपणन निरीक्षक व्यंकटी बुर्ले हा एकच कर्मचारी धान खरेदीचा सर्व कारभार पाहत असल्याचेही आढळून आले आहे. विपणन निरीक्षक व्यंकटी बुर्ले महामंडळाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा गोरखधंदा करत आहे.यामुळे शेतकऱ्यांचा धान खरेदी करण्याला प्राधान्य न देता परस्पर व्यापाऱ्यांचे धान खरेदी केले जात असल्याचे आढळून आले.