भेंडाळा : चामाेर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरात असलेल्या जवळपास पंधरा ते सोळा गावांचा समावेश आहे. सर्व गावे कृषिप्रधान आहेत; परंतु या गावातील शेतकऱ्यांना शेतजमिनीचा पाेत कसा आहे, याबाबत माहिती नाही. गेल्या तीन वर्षांपासून माती परीक्षण न झाल्याने शेतकऱ्यांना पिकांचे खत व्यवस्थापन करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे या भागातील माती परीक्षणाला कृषी विभाग बगल देत आहे की काय? असा सवाल शेतकरी करीत आहेत.
भेंडाळा परिसरातील शेती उपजाऊ आहे. पूर्वी शेतात प्रवेश करताच मातीचे ढेकूळ पायाने फुटायचे, पायाला मुलायमपणाचा जाणवायचा, आता जमीन कडक दिसून येते. रासायनिक खताच्या अतिवापराने मातीतील मुलायमपणा निघून गेला आहे. त्यामुळे माती परीक्षण करणे नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचे आहे; परंतु गेल्या तीन वर्षांपासून माती परीक्षण झाले नाही. माती परीक्षणामुळे शेतात घेण्यात येणाऱ्या पीक खर्चात बचत करून उत्पादन वाढवता येते. सोबतच पिकांना द्यावयाच्या खताची मात्रा निश्चित करता येते. गैरवाजवी खते देण्यावर नियंत्रण येते. नत्र, पालाश, स्फूरद, तांबे, लोह, मॅगनिज, जस्त यासारख्या पोषक द्रव्यांचा व सूक्ष्म मूलद्रव्याचा शोध घेता येतो. यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन व प्रोत्साहित करणे आवश्यक आहे; परंतु तसे होताना दिसत नाही. प्रत्येक शेतकरी आपापल्या पद्धतीने शेतात रासायनिक खते टाकतात. अमर्यादित असा रासायनिक खताचा वापर शेतात होत आहे. त्यामुळे शेतजमिनीसाठी योग्य प्रमाणात रासायनिक खताचा वापर, मृदेचे पोषक द्रव्य वाढवून जमिनीचे आरोग्य नियंत्रित, अबाधित ठेवण्याकरिता मृदा परीक्षण गरजेचे आहे. मात्र, चामोर्शी तालुक्यात मागील तीन वर्षांपासून भेंडाळा परिसरात असलेल्या शेतामध्ये माती परीक्षण न झाल्याचे निदर्शनास आले आहे.
बाॅक्स
तालुका कृषी विभागाचे दुर्लक्ष -धर्मशीला सहारे
चामाेर्शीचे तालुका कृषी अधिकारी शेतकऱ्यांना याेग्य मार्गदर्शन करीत नाही. तसेच मुख्यालयी असतानासुद्धा ते पंचायत समितीमध्ये मासिक बैठकीला उपस्थित राहत नाही. आपला प्रतिनिधी पाठवितात. त्यामुळे कृषीसंदर्भात असणाऱ्या समस्या आम्ही कुणाकडे मांडायच्या, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून भेंडाळा परिसरासह तालुक्यातील शेतीचे माती परीक्षण लवकर करावे, अशी मागणी पंचायत समिती सदस्य धर्मशीला सहारे यांनी केली.
काेट
मागील तीन वर्षांपासून तालुक्यातील भेंडाळा परिसरातील शेतजमिनीचे माती परीक्षण झाले नाही. मागील वर्षी कोरोनाचे संकट असल्याने कोणतीच कामे होऊ शकली नाही. तसेच २०१७ ते २०१९ या या कालावधीत मी या पदावर नव्हतो. मागील वर्षी कोरोना काळातच येथे माझी नियुक्ती झाली. त्यामुळे यापूर्वी माती परीक्षण का झाले नाही, याबाबत सांगू शकत नाही. पंचायत समिची मासिक अथवा त्रैमासिक बैठकीत मी उपस्थित राहताे. केवळ कार्यालयीन कामे असल्यास मी आपला प्रतिनिधी पाठविताे.
-सागर डांगे, तालुका कृषी अधिकारी चामोर्शी