चामोर्शी : पुनर्वसित बंगाली बांधवांना अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र देणे व इतर सोयीसुविधा देण्याच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी तालुक्यातील बंगाली बांधवांच्या वतीने निखिल भारत बंगाली उद्वास्तू समन्वय समितीच्या नेतृत्वात येथील उपविभागीय कार्यालयावर सोमवारी धडक मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर उपविभागीय अधिकारी जी. एम. तळपादे व तहसीलदार यू. जी. वैद्य यांच्या मार्फतीने शासनाला निवेदन सादर करण्यात आले. राज्यातील गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर जिल्ह्यातील पुनर्वसित बंगाली बांधवांच्या विविध मागण्यांकडे शासनाने १५ वर्षांपासून दुर्लक्ष केले आहे. मोर्चे, धरणे आंदोलन व निवेदनाद्वारे शासनाकडे पाठपुरावा अनेकदा करण्यात आला. मात्र बंगाली बांधवांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने बंगाली बांधवांच्या वतीने सोमवारी मोर्चा काढण्यात आला. राज्यातील नम शूद्र, पोंद, राजवंशी जातीला अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र व सवलत देणे, निवासासाठी दिलेल्या जमिनीचे मालकी हक्क देणे, गोंदिया जिल्ह्यातील सात जि. प. बंगाली माध्यमांच्या बंगाली शाळेत बंगाली भाषिक शिक्षकांची नियुक्ती करणे, बंगाली बांधवांना नागरिक प्रमाणपत्र देणे, जिल्ह्यातील संपूर्ण गावे दुष्काळग्रस्त घोषित करून प्रति क्विंटल तीन हजार रूपये भाव धानाला द्यावा, मुलचेरा तालुक्यातील चेन्ना सिंचन प्रकल्पाचे काम पूर्ण करावे, अतिक्रमित वन जमिनीच्या पट्ट्यांसाठी तीन पिढ्यांची अट शिथील करून डिसेंबर २००५ पर्यंत अतिक्रमण केलेल्या सर्व बिगर आदिवासींना वन जमिनीचे पट्टे देण्यात यावे, बंगाली बांधवांना देण्यात आलेल्या वर्ग- २ शेत जमिनी वर्ग- १ मध्ये करणे आदी मागण्यांच्या पुर्ततेसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. मोर्चाचे नेतृत्त्व निखिल भारत बंगाली उद्वास्तू समन्वय समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सुबोध बिश्वास यांनी केले. विविध मागण्यांचे निवेदन प्रदेश सचिव बिधान बेपारी, अध्यक्ष दीपक हलदर, प्रदेश उपाध्यक्ष निर्मलइंदू हलदर, परिमल बौध, सुभाष सरकार, सतीश रॉय, इलाबंद हलदर, प्रशांत मंडल, निखिल बिश्वास, संतोष सरदार, दीपक रॉय यांच्या उपस्थितीत देण्यात आले. मोर्चात समितीचे रवन सरकार, डॉ. मोटूलाल हलदर, बिमल सेन, तालुका सचिव डॉ. कमलेश गाईन, रनेन मंडल व बहुसंख्य बंगाली बांधव उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
चामोर्शी एसडीओ कार्यालयावर बंगाली बांधव धडकले
By admin | Updated: December 15, 2015 03:36 IST