जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा घेतला आढावा गडचिरोली : प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) कुटुंबांना गॅस कनेक्शन देण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात लाभार्थी निवड प्रक्रियेला गतिमान करावे, तसेच या योजनेचा अधिकाधिक कुटुंबांना लाभ देण्यासाठी योग्य नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी दिले. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या दालनात बुधवारी बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी नायक बोलत होते. बैठकीला जिल्हा पुरवठा अधिकारी आर. आर. चांदुरकर, निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवने आदी उपस्थित होते. ग्रामीण भागात महिलांना आजार होण्यामागील मुख्य कारण चुलीचा होणारा वापर हे आहे. चुलीच्या वापरात जीवाश्म इंधनाचाही वापर होतो. या दोन्हीसाठी ही उज्ज्वला योजना अंमलात आणण्यात आली आहे. महिला सक्षमीकरणाचा एक भाग म्हणून सदर योजना विशेषत: ग्रामीण भागातील महिलांना लाभदायक आहे. बीपीएलपात्रधारक कुटुंबातील महिलेला या योजनेंतर्गत गॅस कनेक्शन मिळणार आहे. अर्जदाराला लहान पाच किलोचे अथवा नियमित १४.२ किलोग्रॅमचे सिलिंडर घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे. २०११ च्या जनगणेनुसार गडचिरोली जिल्ह्यात ४ लाख २८ हजार ६१७ इतकी दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या आहे. बीपीएल कुटुंबांची संख्या पहिल्या टप्प्यात निश्चित करण्याचे उद्दिष्ट असून त्यानंतर गावनिहाय व गॅस एजन्सीनिहाय योजनेच्या निकषानुसार पात्र महिलांना या योजनेचा लाभ दिला जाईल, आतापर्यंत जिल्ह्यात ९ हजार ९५१ महिलांचे अर्ज विविध गॅस एजन्सींना प्राप्त झाले असल्याची माहितीही त्यांनी दिली. या योजनेपासून एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. (प्रतिनिधी)
लाभार्थी निश्चिती गतीने करा
By admin | Updated: August 11, 2016 01:24 IST