जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा : सात आंदोलकांना रूग्णालयात हलविलेगडचिरोली : अहेरी जिल्हा निर्माण कृती समिती एटापल्ली व राष्ट्रीय जनहितवादी युवा समितीच्या सदस्य व पदाधिकाऱ्यांनी ६ डिसेंबर रोजी आंदोलनस्थळी दुपारी ४ वाजता सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. मात्र तत्पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलकांना चर्चेसाठी बोलाविल्याने आत्मदहनाचे आंदोलन मागे घेण्यात आले.जारावंडी, कसनसूर, पेरमिली, गट्टा, जिमलगट्टा, आष्टी या नवीन तालुक्यांच्या निर्मितीसह अहेरी जिल्हा व विदर्भ राज्य निर्माण करावे, जिल्ह्यात प्रलंबित असलेल्या सिंचन प्रकल्पाचे काम त्वरित सुरू करावे, एटापल्ली, धानोरा, भामरागड परिसरातून वाहणाऱ्या बांडीया नदीवर मोठे धरण बांधण्यात यावे, गैरआदिवासींचा आदिवासीमध्ये समावेश करून आदिवासींवर अन्याय करू नये, ओबीसी आरक्षण ६ टक्क्यावरून १९ टक्के पूर्ववत करावे, जिल्हा प्राधिकरण निर्माण करून अंमलबजावणी करावी, जिल्हा मंडळ स्थापन करून स्थानिकांना नोकरीत प्राधान्य द्यावे, खनिज संपत्ती व गौण संपत्तीवर आधारित रोजगार निर्मितीकरिता उद्योग धंदे सुरू करावे, अहेरी-गडचिरोली-देसाईगंज रेल्वे मार्गाची निर्मिती करण्यात यावी, या मागणीसाठी अहेरी जिल्हा निर्माण कृती समिती एटापल्ली व राष्ट्रीय जनहितवादी युवा समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तसेच इंदिरा गांधी चौकात ३ डिसेंबरपासून बेमुदत उपोषण सुरू केले. ४ डिसेंबरला रस्ता रोको केला. मात्र मागण्या मान्य न झाल्याने ६ डिसेंबर रोजी सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. यामुळे प्रशासन खळबळून जागे झाले.जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलकांना चर्चेला बोलविले. एकूण मागण्यांपैकी ७५ टक्के मागण्या जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. मात्र लेखी पत्र दिले नाही. त्यामुळे उपोषण आंदोलन सुरूच राहणार आहे. उपोषण आंदोलनात एटापल्ली तालुक्यातील ३०० नागरिक सहभागी झाले आहेत. आंदोलनाचा आज तिसरा दिवस होता. ७ आंदोलकांची प्रकृती बिघडल्याने त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व अहेरी जिल्हा निर्माण कृती समिती एटापल्लीचे अध्यक्ष प्रज्ज्वल नागुलवार व राष्ट्रीय जनहितवादी युवा समितीचे संस्थापक सुरेश बारसागडे करीत आहेत. (नगर प्रतिनिधी)
आत्मदहन आंदोलन मागे
By admin | Updated: December 6, 2014 22:49 IST