आरोग्य विभागाचा उपक्रम : रूग्ण व माहिती देणाऱ्यास मिळणार बक्षीसगडचिरोली : जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग व राज्य शासनाचा आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली जिल्ह्यात यॉज रोग निर्मूलन कार्यक्रम राबविण्यास सुरूवात झाली असून या अंतर्गत यॉज रोगाच्या रूग्णास पाच हजार रूपये व तो आणणाऱ्यास ५०० रूपयांचे नगदी बक्षीस दिले जाणार आहे. आरोग्य विभागाच्या मार्फतीने १९९७ पासून यॉज रोगाच्या रूग्णांची शोध मोहीम हाती घेण्यात येते. महाराष्ट्रात गडचिरोली व चंद्रपूर या दोनच जिल्ह्यात यॉज रोगाचे रूग्ण आढळून येतात. देशातील फक्त ५१ जिल्ह्यांमध्ये या रोगाचे रूग्ण आढळून आले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात १९९८ रोजी ४७ यॉजचे रूग्ण आढळले होते. २००० मध्ये कढोली या गावात एक रूग्ण आढळून आला. त्यानंतर मात्र गडचिरोली जिल्ह्यात यॉजचे रूग्ण आढळूनच आले नाही. जिल्हाभरातही २००३ नंतर यॉजचा रूग्ण आढळून आला नाही. तरीही प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दरवर्षी यॉज रूग्णांची शोध मोहीम आरोग्य विभागाच्या मार्फतीने राबविण्यात येते. या अभियानाला जनतेचे सहकार्य मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी आरोग्य विभागाच्या मार्फतीने व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. या जनजागृतीचा एक भाग म्हणूनच यॉज रूग्ण आढळून आल्यास त्याला पाच हजार रूपयांचे व रूग्ण आणलेल्या व्यक्तीस ५०० रूपयांचे नगदी बक्षीस दिले जाणार आहे. सदर बक्षीस रूग्णाच्या रक्ताची तपासणी केल्यानंतरच दिले जाणार आहे.
‘यॉज’ रोग निर्मूलन कार्यक्रमाला सुरुवात
By admin | Updated: October 4, 2015 02:16 IST