रोजगार मार्गदर्शन मेळावा : अश्विनी धात्रक यांचे आवाहनगडचिरोली : गडचिरोली नगर पालिका क्षेत्रात सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींची संख्या मोठी आहे. या युवक युवतींनी नगर परिषद प्रशासनाच्या वतीने राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत शहरातील संस्थांकडून मिळणाऱ्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगारभिमुख बनावे, असे आवाहन नगराध्यक्ष डॉ. अश्विनी धात्रक यांनी केले.राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत नगर परिषद गडचिरोलीच्या वतीने बुधवारी पोटेगाव मार्गावरील गोंडवाना कलादालनात आयाजित रोजगार मार्गदर्शन मेळाव्याचे उद्घाटन नगराध्यक्ष डॉ. धात्रक यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून माजी पाणीपुरवठा सभापती संजय मेश्राम, महिला व बालकल्याण सभापती शारदा दामले, नियोजन सभापती बेबी चिचघरे, शिक्षण सभापती विजय गोरडवार, नगरसेविका मीनल चिमुरकर, संध्या उईके आदी उपस्थित होते. नगर पालिका क्षेत्रातील युवक, युवतींनी मोठ्या संख्येने नगर परिषदेमार्फत विविध संस्थांकडून मिळणाऱ्या व्यावसायिक प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही नगराध्यक्ष डॉ. अश्विनी धात्रक यांनी यावेळी केले. नगरसेवक संजय मेश्राम यांनी युवक व युवतींनी सध्याच्या विज्ञान युगात नेहमी कृतिशील राहिले पाहिजे, शिक्षणाचा पुरेपुर वापर करून व्यावसायिक शिक्षणाची कास धरावी, युवकांनी सतत उद्योगी राहिले तर कुटुंबासह गडचिरोली जिल्ह्याचा विकास होईल. यासाठी शासनाच्या योजनांचा फायदा घ्यावा, असे सांगितले. याप्रसंगी शहरातील विविध व्यावसायिक प्रशिक्षणाचे काम करणाऱ्या संस्थांच्या प्रतिनिधींनी व्यावसायिक कोर्सेसबाबत यावेळी उपस्थित युवक-युवतींना माहिती दिली. तसेच प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. प्रास्ताविक मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे यांनी केले तर संचालन व आभार बंडू दामले यांनी मानले.
प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगाराभिमुख बना
By admin | Updated: January 28, 2016 01:28 IST