वैरागड : पावलांना दिशा मिळेल तिकडे वाट शोधली आणि मिळेल त्या अन्नावर जीवन कंठत वृद्ध नागरिक उगवत्या सूर्याला नमस्कार करीत सहज जगत राहिला. मात्र वृद्धापकाळ सोसण्यापलिकडे झाला. तेव्हा मात्र म्हाताऱ्याने पाठ टेकली. त्यावेळी ‘लोकमत’ चे वैैरागड येथील प्रतिनिधी प्रदीप बोडणे यांनी वृद्धाला मदतीचा हात दिला. वेळेवर रूग्णवाहिका बोलावून त्याला जिल्हा सामान्य रूग्णालयात भरती केले व त्यामुळे अस्थिपंजर झालेल्या वृद्धाला नवजीवन मिळाले व आणखी काही दिवस जगण्याची आशा निर्माण झाली आहे. कढोली-मानापूर वळणावर असलेल्या श्रीराम खापरे यांच्या हॉटेलच्या झोपडीत एक वृद्ध नागरिक बरेच दिवस मुक्कामाला होता. भिक्षा मागून जीवन जगत होता. मात्र भिक्षा मागण्याची उमेद संपली तेव्हा ये- जा करणारे वाटसरू भाकरीचा तुकडा देऊन भूक शमवीत होते. अनोळखी वृद्ध नागरिकाची गावात चर्चा होती. म्हाताऱ्याच्या वेदना जाणून घ्यायला कुणीच समोर येत नव्हते. एक दिवस लोकमतचे वार्ताहर प्रदीप बोडणे यांनी वृद्ध नागरिकाची चौकशी केली असता, त्याने मोहम्मद असे नाव उच्चारले यावरून तो मुसलमान असावा, त्याला चिवडा आणि ५० रूपये दिले. त्यामुळे दोन दिवस म्हाताऱ्याच्या अन्नाची सोय झाली. त्यामुळे सदर म्हातारा चार पाऊले टाकू लागला व आपल्या वाटेने काही दूर निघून गेला. आठ- दहा दिवसांनी म्हातारा भंडारेश्वराच्या पायथ्याशी करपडा घाटाजवळ अस्थीपंजर अवस्थेत पडून होता. ही बाब लक्षात आल्यानंतर रामदास डोंगरवार यांनी वैैद्यकीय अधिकारी डॉ. वाघधरे यांना सांगितली. त्यांनी १०८ क्रमांकाची रूग्णवाहिका जागेवरच बोलाविली. रूग्णवाहिकेने म्हाताऱ्याला तत्काळ जिल्हा सामान्य रूग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले. यासाठी डॉ. देवेंद्र हिवसे, अमित सिडाम, थामदेव गेडाम, चालक शुभम कोरगंटीवार यांनी सहकार्य केले. लोकमत वार्ताहर व इतरांनी केलेल्या सहकार्यामुळे माणसातील माणुसकी अजुनही जिवंत आहे. अडचणीच्या वेळी ती धावून येते, याचा परिचय दिला. अडचणीच्या वेळी जात, धर्म, पंथ यांची बंधने तुटून पडतात. सदर म्हातारा भलेही दोन वर्ष जगणार नाही, मात्र आणखी काही दिवस निश्चितच जगेल, अशी आशा वैरागडवासीयांनी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)
अस्थिपंजर वृद्धाला मिळाले जीवदान
By admin | Updated: November 4, 2015 01:38 IST