गडचिरोली : ३१ मेच्या मध्यरात्रीनंतर पेट्रोल व डिझेलची अनुक्रमे ४ रूपये व २.४० रूपयांनी दरवाढ केली. त्याचप्रमाणे १ जूनपासून सेवा करात ०.५ टक्के तसेच विनाअनुदानित सिलिंडरचे दर २१ रूपयांनी वाढविण्यात आले. केंद्र व राज्य शासनाने अनेक वस्तूंची दरवाढ केल्यामुळे सर्वसामान्य नागरिक अडचणीत आले आहेत. शासनाकडून झालेली ही दरवाढ अन्यायकारक आहे. त्यामुळे सदर दरवाढ मागे घेण्यात यावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनातून जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांना सोमवारी केली.जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी नायक यांना भेटले. २६ मे २०१६ रोजी भाजप प्रणीत केंद्र सरकार सत्तेवर आले. त्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत १०८ डॉलर प्रतिबॅरल होती. आता सदर किंमत ५० डॉलरपेक्षा कमी आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती सुमारे ५५ टक्क्यांनी घसरल्या असतानासुद्धा केंद्र सरकार याचा लाभ देशातील सर्वसामान्य पेट्रोल व डिझेल ग्राहकांना का मिळवून देत नाही, असा प्रश्नही माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी यांनी निवेदनातून सरकारला केला आहे.निवेदन देताना काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव हसनअली गिलानी, युकाँचे प्रदेश सचिव पंकज गुड्डेवार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकरराव सालोटकर, जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र भरडकर, महासचिव प्रभाकर वासेकर, शहराध्यक्ष सतीश विधाते, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग घोटेकर, रोजगार व स्वयंरोजगार सेलचे जिल्हाध्यक्ष काशिनाथ भडके, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनिकांत मोटघरे, नेताजी गावतुरे, पं. स. सदस्य अमिता मडावी, मुखरू निलेकार, विजय भांडेकर आदींसह काँग्रेसचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)निवेदनातील मागण्या४शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, १ लाख रूपयांच्या आतील कर्ज वितरणासाठी सातबारावर बोजा चढविण्यात येऊ नये, शेतकऱ्यांना मोफत बी-बियाणे व खते देण्यात यावे, कृषी कर्ज उचलण्यासाठी हस्तलिखीत सातबारा ग्राह्य धरण्यात यावा, शेतकऱ्यांना महाबिजतर्फे मोफत धान बियाणे पुरविण्यात यावे, कन्नमवार जलाशयातील गाळ काढून फुटलेल्या नहराची दुरूस्ती करण्यात यावी, आदिवासी विकास महामंडळातर्फे धानचुकारे व बोनसची रक्कम देण्यात यावी, गडचिरोलीचे महिला व बाल रुग्णालय सुरू करण्यात यावे, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बोअरवेल व सिंचन विहिरींचा मोफत लाभ देण्यात यावा, २०१४ मधील तेंदू मजुरांना बोनसची रक्कम अदा करण्यात यावी, रोहयोची थकीत मजुरी अदा करण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश आहे.
वस्तूंची भाववाढ अन्यायकारक
By admin | Updated: June 8, 2016 01:16 IST