चोरटे पसार : अहेरीच्या महाराष्ट्र बँकेतील घटनाअहेरी : येथील राष्ट्रीयकृत बँक म्हणून प्रसिध्द असलेल्या महाराष्ट्र आॅफ बँक शाखेत रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बँकेच्या मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप फोडून आत प्रवेश करून चोरीचा प्रयत्न केला. मात्र सायरन वाजल्याने चोर पसार झाले. यामुळे चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसला.अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास येथील महाराष्ट्र बँकेच्या मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप फोडले व आत प्रवेश केला. बँकेत लावलेले चार सीसीटीव्ही कॅमेरे झुकवून चोरट्यांनी सायरनचे वायर कापले. त्यानंतर रोकड असलेला मुख्य लॉकर सब्बल व हातोड्यानी फोडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान सायरन मोठ्या आवाजात वाजल्याने चोरट्यांनी तेथून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच अहेरी पोलीस घटनास्थळी पोहोचले. रविवारी बँकेचे शाखा प्रबंधक व कर्मचाऱ्यांनी बँकेत येऊन पाहणी केली व या घटनेची माहिती वरिष्ठांना दिली. अहेरी पोलिसांनी श्वान पथकाद्वारे चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरटे हाती लागले नाही. या घटनेचा पुढील तपास अहेरीचे पोलीस निरिक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक निलेश सोळुंखे करीत आहेत. या घटनेची अहेरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. (शहर प्रतिनिधी)
बँकेत चोरीचा प्रयत्न फसला
By admin | Updated: June 13, 2016 02:49 IST