चौकशी करा : बांधकाम, पाणीपुरवठा विभागाच्या कामात गोंधळाची चर्चागडचिरोली : पोलीस खात्याकडे नऊ लाखांवर अधिक रकमेची खोटी बिल सादर करण्याचे धाडस करणारा कंत्राटदार एस. के. आझाद हा जिल्ह्याच्या कंत्राटदारांमध्ये सर्वांवरच भारी पडणारा होता, अशी चर्चा आता पसरली आहे.‘एक बिहारी, सब पे भारी’ असा नारा अहेरी उपविभागात मागील १० वर्षांपासून गुंजत होता. शासनाच्या प्रत्येक विभागात आझाद माल पुरवठ्याचे काम करायचा. या विभागातील अधिकाऱ्यांचे त्याच्याशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. या विभागातही असे अनेक बोगस बिल टाकून रकमेची उचल यापूर्वी झाली असावी, अशी चर्चा आता जोरात पसरली आहे.१० वर्षांपूर्वीपासून बिहार राज्यातून येऊन आझादने गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी भागात आपल्या साथीदारांमार्फत हातपाय पसरविले होते. गृहविभागासह पाणीपुरवठा, बांधकाम, सार्वजनिक बांधकाम आदी विभागांमध्ये आझाद कोटींचे काम घेत होता. शासकीय यंत्रणा त्याच्या दिमतीलाच जणू बांधलेली होती. तो म्हणेल ते काम मिळेल, असा आझाद साहेबांचा दरारा होता, असे अहेरीत अनेकजण सांगतात. गडचिरोली पोलिसांनी आझादला अटक केल्यामुळे त्याचे अनेक साथीदार आता अंडरग्राऊंड होऊन त्याला मदतीचा हात देत आहेत. कारण कारवाईचे जाळे भविष्यात हातपाय पसरू शकते, याची जाणीव आता त्यांना झालेली आहे. आघाडी शासनाच्या काळात २०१० पासून जिल्हा विकास निधीतून हजारो कोटी रूपयांची कामे झालीत. या भागात स्थानिक कंत्राटदारांना वगळून प्रशासनाच्या विविध विभागाने आझाद याच्यावर फारमोठी मर्जी काम वाटपाच्या बाबत दाखविली होती. नक्षलग्रस्त भागात काम करून आझाद कोट्यधीश झाला, असेही त्याचे अनेक सहकारी सांगतात. गडचिरोलीत इमारती, फ्लॅट, प्लॉट, नागपूर, बुट्टीबोरी अशा ठिकाणीही आझादने संपत्ती जमविली, अशी माहिती त्याचे सहकारी आता देत आहेत. पोलीस यंत्रणनेने आपल्या विभागातील बोगस देयकाची चौकशी करून आझादवर गुन्हा दाखल केला आहे. त्याचप्रमाणे मागील १० वर्षात आझादने शासनाच्या ज्या-ज्या विभागात कंत्राट घेतले, तेथीलही देयकाचीही चौकशी गुप्तचेर यंत्रणेमार्फत करावी, अशी मागणी आता जोर धरून आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
पोलिसांनी जेरबंद केलेला आझाद होता सर्वांवर भारी
By admin | Updated: July 31, 2015 01:45 IST