एटापल्ली येथे कार्यक्रम : दौड स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरणलोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : ४ कोटी वृक्ष लागवड अंतर्गत १ ते ७ जुलै या कालावधीत तालुक्यात वृक्ष लागवड केली जाणार आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी एटापल्ली येथे नुकतीच मॅरेथॉन दौड स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत ४८ मुले व ११ मुलींनी भाग घेतला.वन परिक्षेत्र कार्यालय एटापल्ली पासून गुरूपल्ली मार्गावर अडीच किमी जाणे व अडीच किमी येणे अशी पाच किमी अंतराची स्पर्धा ठेवण्यात आली. मॅरेथॉन स्पर्धेला भामरागडचे उपवन संरक्षक बाला यांनी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी न. पं. उपाध्यक्ष रमेश गंपावार, जि. प. सदस्य संजय चरडुके, नगरसेवक जितेंद्र टिकले, नगरसेवक योगेश नलावार, पं. स. सदस्य जनार्धन नल्लावार, नगरसेवक तानाजी धुर्वा, देवतळे, एसबीआयचे शाखा व्यवस्थापक दत्ता, सीआरपीएफचे रावत, पोलीस ठाण्याचे ठाणेदार पाटील, नगरसेविका चांदेकर, योगशिक्षक हिचामी, पत्रकार रवी रामगुंडेवार, वन परिक्षेत्र अधिकारी आर. जी. मून, आर. एस. वैैद्य उपस्थित होेते.मॅरेथॉन कार्यक्रमस्थळी पुरूष गटातून प्रथम क्रमांक दिनेश उलगे गोटा, द्वितीय क्रमांक रोशन हिचामी, तृतीय क्रमांक सशांक दहागावकर, महिलांमध्ये प्रथम क्रमांक साधना तलांडे, द्वितीय क्रमांक जयशिला उसेंडी, तृतीय क्रमांक ललीता मडावी यांनी पटकाविला. विजयी स्पर्धकांना अनुक्रमे ३ हजार, २ हजार व १ हजार रूपये, शिल्ड, प्रमाणपत्र व मेडलसह देण्यात आले. सहभागी स्पर्धकांना सहभागी प्रमाणपत्र देण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. स्पर्धेसाठी निर्धारित मार्गावर १०० मिटर अंतरावर वन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. एटापल्ली वन परिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने सायकल रेस, मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. संचालन पी. बी. मानापुरे, राजू बारस्कर तर आभार हरिष दहावगावकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी वन कर्मचारी व अधिकाऱ्यांनी सहकार्य केले.
मॅरेथॉन स्पर्धेतून वृक्ष लागवडीबाबत जागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2017 00:58 IST