गडचिरोली : राज्य सरकारने संपूर्ण राज्यात तंबाखूजन्य पदार्थाची विक्री व सेवनावर बंदी घातली आहे. यावर्षीपासून तंबाखूमुक्त अभियानही राबविण्यात येत आहे. या अभियानासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. जिल्ह्यातील सर्वच घटक तंबाखूमुक्त झाले पाहिजे, यासाठी जिल्हा प्रशासनाने जनजागृती अभियान हाती घेतली आहे. आता गरोदर महिलांमध्ये तंबाखूविरोधी जनजागृती करण्यासाठी आशा वर्कर व एएनएम पुढाकार घेणार असल्याचे जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी बुधवारी पत्रकारांशी चर्चेदरम्यान सांगितले.यावेळी ते म्हणाले, गडचिरोली आदिवासी बहूल मागास जिल्ह्यात तंबाखूजन्य पदार्थ सेवनाचे प्रमाण अधिक आहे. शालेय विद्यार्थ्यांपासून तर वयोवृध्द नागरिकांपर्यंत हे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. गरोदर मातासुध्दा तंबाखूजन्य पदार्थांचा सेवन करीत आहेत. यामुळे जिल्ह्यात कुपोषणाची समस्या आणखी वाढू शकते. हे लक्षात घेऊन तंबाखूविरोधी अभियानादरम्यान आशा वर्कर व एएनएम या ग्रामीण व दुर्गम भागात जाऊन गरोदर मातांमध्ये जनजागृती करणार असल्याचेही जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी सांगितले. शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्येसुध्दा तंबाखूविरोधी जनजागृती घडविण्यासाठी प्रशासन प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)
आशा, एएनएम करणार तंबाखूविरोधी जागृती
By admin | Updated: August 14, 2014 23:43 IST