चुरमुरा : आरमोरी-देसाईगंज मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून मार्गावरील डांबर उखडले आहे. त्यामुळे वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. आरमोरी- देसाईगंज मार्ग पुढे कुरखेडा, कोरची तालुक्यात जाता येते. त्याचबरोबर भंडारा जिल्ह्यात जाणारे अनेक वाहनधारक याच मार्गाचा वापर करतात. देसाईगंज येथे रेल्वेस्टेशन आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणूनही या शहराचा लौकीक आहे. त्यामुळे व्यापारी व रेल्व ेप्रवाशीही नियमितपणे देसाईगंजला जातात. परिणामी या मार्गावरून नेहमीच दुचाकी, चारचाकी, मालवाहू वाहनांची वर्दळ असल्याचे दिसून येते. सदर मार्ग जिल्ह्यातील मुख्य व अत्यंत महत्त्वाचा मार्ग असून या मार्गाची देखभाल करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. या मार्गाची सार्वजनिक बांधकाम विभागाने उन्हाळ्यात दुरूस्ती केली नाही. परिणामी डांबर उखडून गेले आहे. काही ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. रात्रीच्या सुमारास या खड्ड्यांमध्ये वाहन जाऊन अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. खड्ड्यांमुळे लहान- मोठे अपघातही घडत आहेत. त्यामुळे या मार्गाच्या दुरूस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष घालून दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
खड्ड्यात आरमोरी-देसाईगंज मार्ग
By admin | Updated: May 24, 2015 02:07 IST