गडचिरोली : सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन २०१६-१७ अंतर्गत प्रारूप आराखडा/प्राप्त प्रस्तावाची छाननी करण्याकरिता लघु गटांची बैठक आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आ. क्रिष्णा गजबे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी रणजीतकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन नागदेवे, जिल्हा नियोजन अधिकारी धनंजय सुटे आदी उपस्थित होते. या बैठकीत आ. क्रिष्णा गजबे यांनी आरमोरी विधानसभा क्षेत्रात विद्यमान स्थितीत विकास कामांवर खर्च करण्यात आलेल्या निधीचा आढावा घेतला. मागील वर्षाचा मंजूर निधी व खर्चाच्या टक्केवारीचा विचार करून सन २०१६-१७ साठी मागणी केलेल्या निधीला मंजुरी देण्यात आली. तसेच पुरवणी मागणीचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना आ. गजबे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी प्रमुख विभागाचे अधिकारी उपस्थित होते.आरमोरी विधानसभा क्षेत्रात कोरची, कुरखेडा, आरमोरी, देसाईगंज हे तालुके येतात. देसाईगंज ही एक नगर परिषदही याच मतदार संघात आहे. त्यामुळे निधीचा विनियोग निश्चित करण्यात आला.
आरमोरी क्षेत्रातील निधीला मंजुरी
By admin | Updated: November 11, 2015 00:54 IST