जिल्हाधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश : प्रकाश ताकसांडे यांच्या मागणीची दखल गडचिरोली : गडचिरोली शहरात प्रमुख स्थळी सीसीटीव्ही कॅमेरे लावावे, असे निर्देश जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. शहरातील अवैैध धंदे व वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्याकरिता शहरातील प्रमुख चौक, रस्ते, महत्त्वाचे ठिकाण, पोलीस ठाणे येथे सीसीटीव्ही कॅमेरे लावावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश ताकसांडे यांनी आदिवासी विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्याकडे केली होती. त्यांच्या मागणीची दखल घेऊन आदिवासी विकास राज्यमंत्र्यांच्या खासगी सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भातील पत्र पाठविले. शहरातील एकाही चोरीच्या घटनेचा वर्षभरात तपास लागलेला नाही. ५० हजार लोकसंख्या असलेल्या गडचिरोली शहरात एकही सीसीटीव्ही कॅमेरा नाही. त्यामुळे चोरांचा शोध घेतांना पोलिसांचीही अडचण होते. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे लावावे, अशा आशयाचे निवेदन प्रकाश ताकसांडे यांनी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांना पाठविले होते. या मागणीची दखल घेत शहरातील प्रमुख स्थळी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
गडचिरोलीत प्रमुख स्थळी सीसीटीव्ही कॅमेरे लावा
By admin | Updated: July 25, 2016 01:42 IST