सिरोंचा : गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुका हा अनेक दुर्गम व आदिवासी बहुल गावांनी व्यापलेला असून, या भागात मूलभूत सुविधांची टंचाई आजही जाणवते. त्यातच अहेरी - देवलमरी - वेंकटापूर - मोयाबिनपेठा- सिरोंचा मार्गावर असलेला वट्रा खुर्द येथील लहान पूल दरवर्षी पावसाळ्यात गावकऱ्यांच्या समस्यांना निमंत्रण देतो.
पावसाळ्यात या लहान पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यामुळे हा मार्ग १ ते २ महिने पूर्णपणे बंद राहतो. परिणामी, या मार्गावर अवलंबून असलेल्या २० ते ३० गावांतील नागरिकांना अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण आणि दळणवळण यांसारख्या मूलभूत गरजांसाठी प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागते.
आपत्कालीन आरोग्य सेवा, रुग्णवाहिका, गर्भवती महिलांची ने-आण, शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची वाहतूक या सर्व गोष्टी थांबतात. या समस्येमुळे संपूर्ण परिसर शहरी संपर्कापासून तुटतो आणि नागरिक जणू पावसाळ्यात कैदेतच अडकतात.
स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे उंच आणि मजबूत पुलाची मागणी केली असली, तरी ती आजतागायत फक्त कागदावरच राहिली आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. सुधीर किसन मुडुमडिगेला (मु. टेकडा ताला), श्री. प्रभाकर परपटलावर (मु. मोयाबिनपेठा), आणि श्री. राम वेकन्ना अग्गुवार (मु. नरसिंहपल्ली) यांनी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली, श्री. सुहास गाडे यांना निवेदन सादर करून वट्रा खुर्द येथे उंच व मजबूत पुलाची तातडीने मंजुरी देण्याची जोरदार मागणी केली आहे.
या निवेदनात त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, सध्याचा पूल हा फारच कमी उंचीचा असून, अल्प पावसातही पाण्याखाली जातो. त्यामुळे पूल बंद पडल्यावर या मार्गावरील सर्व वाहतूक ठप्प होते आणि सामान्य जनतेचे जीवनमान पूर्णपणे विस्कळीत होते.
"आम्हाला विकासाची नाही, तर जीवन जगण्यासाठी मूलभूत सुविधांची गरज आहे," अशी भावना अनेक गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
गावकऱ्यांच्या या दीर्घकालीन मागणीचा गांभीर्याने विचार करून वट्रा खुर्द येथे उंच आणि टिकाऊ पूल उभारणे ही काळाची गरज आहे, हे प्रशासनाने ओळखावे, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.