रमेश मारगोनवार - भामरागडअत्यंत विपरीत परिस्थितीत दीनदुबळ्या लोकांची सेवा करण्याच्या उद्देशाने बाबा आमटे यांनी तालुक्यातील हेमलकसा येथे २३ डिसेंबर १९७३ मध्ये लोकबिरादरीची स्थापना केली. तेव्हापासून या ठिकाणी बाबा आमटे यांचे ज्येष्ठ पूत्र डॉ. प्रकाश आमटे व स्रुषा डॉ. मंदाकिनी आमटे यांनी समाजसेवेमध्ये स्वत:ला वाहून घेतले. हेमलकसा येथे आश्रमशाळा, आदिवासी माणसाला आरोग्याची सुविधा व हिंस्त्र पशुंवर औषधोपचार करण्याचे मौलिक कार्य डॉ. प्रकाश आमटे दाम्पत्य गेल्या अनेक वर्षापासून करीत आहे. साक्षात नि:स्वार्थ समाजसेवेची कर्मभूमी असलेल्या हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्पाला आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव मुकेश खुल्लर यांनी भेट दिली. दरम्यान येथील कार्यपध्दती व समाजसेवेचे प्रत्यक्षात व्रत पाहून खुद्द प्रधान सचिवही थक्क झाले!गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या भामरागड तालुक्यात डॉ. आमटे दाम्पत्यांचे लोकबिरादरी प्रकल्प आहे. या प्रकल्पात आदिवासींसाठी शिक्षण, आरोग्य सुविधा पुरविण्याचे महत्वाचे काम होत असल्याचे प्रधान सचिव मुकेश खुल्लर यांनी पुस्तकातून वाचले होते. पद्मश्री बाबा आमटे व डॉ. प्रकाश आमटे दाम्पत्याचे समाजसेवेचे कार्य खुल्लर यांनी पुस्तकातून वाचले होते, ऐकले होते. मात्र आदिवासी विकास विभागाची धूरा हातात घेतल्यानंतर प्रधान सचिव मुकेश खुल्लर यांनी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा करण्याचे ठरविले. दरम्यान शनिवारी त्यांनी भामरागड तालुक्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाला भेट दिली. समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांच्याशी तेथील कार्यप्रणालीबाबत माहिती जाणून घेतली. प्राण्यांची सेवा कशी केल्या जाते, हे ही प्रत्यक्षात त्यांनी डॉ. प्रकाश आमटे यांच्याकडून जाणून घेतले. दुर्गम भागातील आदिवासींसाठी सुरू असलेले आमटे दाम्पत्याचे हे समाजसेवेचे कार्य हे अत्यंत वाखाणण्यासारखे असल्याची स्पष्ट प्रतिक्रिया खुल्लर यांनी यावेळी केली. याप्रसंगी अनेक अधिकारी उपस्थित होते.
...अन् प्रधान सचिव झाले थक्क !
By admin | Updated: June 23, 2014 00:04 IST