दोघांना अटक : देसाईगंज पोलिसांची कारवाई देसाईगंज : देसाईगंज पोलिसांनी जेजानी पेपरमिलजवळ सापळा रचून २३ जुलै रोजी दारूसह ४१ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. देसाईगंज ते आरमोरी मार्गाने दुचाकीने दारूची अवैध वाहतूक होत आहे, अशी खात्रिशीर माहिती पोलीस निरिक्षक रवींद्र पाटील यांना प्राप्त झाली. त्यानुसार रवींद्र पाटील व पोलिसांनी या परिसरात सापळा रचला. जेजानी पेपरमिलजवळ एमएच ३३-५९३७ क्रमांकाच्या दुचाकीला हात दाखवून थांबविले. दुचाकीची तपासणी केली असता, दुचाकीमध्ये देशी दारूच्या ९० एमएल मापाच्या १५० निपा आढळून आल्या. त्याची किमत ६ हजार रूपये एवढी होते. त्याचबरोबर ३५ हजार रूपये किमतीची दुचाकीसुध्दा जप्त केली आहे. या प्रकरणी रूपेश रघुनाथ धनोजे (२१), प्रतीक गिरीधर मेश्राम दोघेही रा. तुकूम वार्ड देसाईगंज यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली. पुढील पोलीस निरिक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात तपास सहायक फौजदार सीताराम लांजेवार करीत आहेत. (वार्ताहर)
दारूसह ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2016 01:39 IST