कोत्तूर येथे गाव संघटना व मुक्तिपथ तालुका चमूने दारू विक्रेत्याच्या घर व परिसराची पाहणी केली असता साखरेचा सडवा व दारू आढळून आली. जवळपास ९ हजार रुपये किमतीचा २०० लिटर साखरेचा सडवा व २० लिटर दारू गाव संघटनेच्या महिलांनी जप्त करून नष्ट केली. मुलचेरा नगर पंचायत व मुक्तिपथने शहरातील ९ किराणा दुकानांची तपासणी करीत तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या तीन दुकानांवर दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून २ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करीत तंबाखूजन्य पदार्थांची होळी करण्यात आली. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून थुंकल्यास कोरोना विषाणूचा प्रसार होत असल्याचे समोर आले आहे. यामुळे पानठेले बंद ठेवण्याचे व किराणा दुकानातून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री न करण्याचे आवाहन केले आहे. या नियमाचे उल्लंघन होत असल्याचे लक्षात येताच स्थानिक प्रशासनाने मुलचेरा शहरातील ९ दुकानांची तपासणी केली. दरम्यान, तीन दुकानांत तंबाखू, खर्रे इत्यादी तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. याप्रकरणी एकूण २ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठाविण्यात आला, तसेच पुन्हा तंबाखूजन्य पदार्थांची विक्री न करण्याची तंबी देण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या संपूर्ण तंबाखूजन्य पदार्थांची नगर पंचायतच्या परिसरात होळी करण्यात आली, तसेच मास्क न लावता फिरणाऱ्या दोघांकडून ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या मोहिमेत न.पं. कर्मचारी जगदीश वाढई, मनोज मेश्राम, मुक्तिपथ तालुका संघटक रूपेश अंबादे सहभागी झाले होते.
आरमोरी तालुक्यातील शिवणी येथील एका दुकानातून जवळपास पाच हजारांचा तंबाखूजन्य पदार्थ जप्त करीत त्याची होळी करण्यात आली. ग्रामपंचायत, पोलीस पाटील व मुक्तिपथने संयुक्त कारवाई करीत गावात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री न करण्याचे आवाहन केले. शिवणी ग्रामपंचायत, पोलीस पाटील व मुक्तिपथने संयुक्तरीत्या शिवणी येथील ५ दुकानांची तपासणी केली. दरम्यान, एका दुकानात साधा तंबाखू, गोड सुपारी, खर्रा पन्नी, ईगल, गुल, ठोकर तंबाखू, गुडाखू, असे जवळपास ५ हजारांचे तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. संपूर्ण मुद्देमाल जप्त करीत होळी करण्यात आली आहे. संबंधित दुकानदारांकडून ग्रामपंचायतीतर्फे दंड वसूल करण्यात येणार आहे. यावेळी पोलीस पाटील शकुंतला पत्रे, ग्रामपंचायत कर्मचारी व मुक्तिपथ तालुका संघटक नीलम हरिणखेडे उपस्थित होत्या.
गडचिरोलीत विनामास्क
फिरणाऱ्यांवर कारवाई
गडचिराेली नगर परिषद, पोलीस स्टेशन व मुक्तिपथने संयुक्तरीत्या मोहीम राबवीत शहरातील पाच किराणा दुकानांची तपासणी केली असता एकाही दुकानात तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले नाहीत. दरम्यान, मास्क न घालणाऱ्या दोघांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. संचारबंदी नियमांचे होणारे उल्लंघन टाळण्यासाठी नगर परिषद, पोलीस स्टेशन व मुक्तिपथने मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार शहरातील मुख्य किराणा दुकानांची तपासणी करण्यात आली. तंबाखूजन्य पदार्थांची साठवणूक व विक्री करू नका, असे किराणा व्यावसायिकांना प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले. मोहिमेत कोविड पथकाचे शरद सोनटक्के, किशोर धाईत, पोलीस स्टेशनचे खोब्रागडे, मुक्तिपथचे तालुका संघटक अमोल वाकूडकर सहभागी झाले.
===Photopath===
210421\21gad_1_21042021_30.jpg
===Caption===
काेत्तूर येथे जप्त केलेला साखरेचा सडवा व माेहफूल दारू.