अहेरी : अहेरी उपविभागांतर्गत येणाऱ्या तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या विकासाची धुरा सांभाळणाऱ्या अहेरी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात गुरूवारी स्मशान शांतता पसरली होती. कार्यालयातील अनेक कर्मचारी आपल्या सहकारी कर्मचाऱ्याच्या लग्नसमारंभासाठी गेले असल्याने दुपारी ३ वाजताच्या सुमारास केवळ तिनच कर्मचारी कार्यालयात हजर असल्याचे दिसून आले. अहेरी उपविभागात अहेरी, एटापल्ली, भामरागड, मुलचेरा, सिरोंचा हे तालुके येतात. या तालुक्यांसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाने अहेरी व भामरागड येथे स्वतंत्र कार्यालय दिले आहे. अहेरी कार्यालयांतर्गत मुलचेरा, सिरोंचा व एटापल्ली या तालुक्यांचा कारभार चालतो. हे अत्यंत महत्त्वाचे कार्यालय आदिवासी विकास विभागाच्या योजना चालविण्यासाठीचे आहे. या कार्यालयात शेकडो नागरिक, विद्यार्थी, कंत्राटदार व अनेक लोक दररोज येतात. गुरूवारी कार्यालय सकाळी उघडल्यापासूनच कर्मचारी कार्यालयात दिसून आले नाही. बुधवारी कार्यालयातील एका कर्मचाऱ्याचे लग्न असल्याने त्याच्या लग्न कार्यासाठी गेलेल्या या कर्मचाऱ्यांनी गुरूवारी या कार्यालयाला दांडी मारली. त्यामुळे कार्यालय वाऱ्यावर होते. दुपारी ३ वाजताच्या सुमारास लोकमत प्रतिनिधीने या कार्यालयाकडे फेरफटका मारला असता, केवळ चपराशी व आवक-जावक विभाग व लेखाविभागातील प्रत्येकी एक कर्मचारी हजर असल्याचे दिसून आले. यासंदर्भात सदर प्रतिनिधीने प्रकल्प अधिकारी आर. आर. सोनकवडे यांना विचारणा करण्याकरिता संपर्क केला असता, त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता. (शहर प्रतिनिधी)
अहेरी प्रकल्प कार्यालय वाऱ्यावर
By admin | Updated: May 14, 2015 01:25 IST